|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » मुंबईतील पुरात अनेकांना वाचवणाऱयाचा डेंग्यूने मृत्यू

मुंबईतील पुरात अनेकांना वाचवणाऱयाचा डेंग्यूने मृत्यू 

प्रतिनिधी/ चिपळूण

काही दिवसांपूर्वी मुंबई-दिवा येथे आलेल्या पुरात अडकलेल्या अनेकांना वाचवून देवदूत बनलेल्या चिपळूण तालुक्यातील वैजी-बौद्धवाडी येथील तरूणाचाच डेंग्यू आजाराने मृत्यू झाला. त्यामुळे त्याच्या 1 वर्षाच्या मुलासह कुटुंब पोरके झाले आहे.

दीपक काशिराम कांबळे (32, सध्या रा. दिवा) असे या तरूणाचे नाव आहे. दीपक हा नोकरीनिमित्त दिवा येथे पत्नी व मुलासह रहात होता. काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे दिवा येथे पूर आला होता. या पुरात काही नागरिक अडकले होते. त्यामुळे दीपक याने बऱयाच नागरिकांना सुखरूप बाहेर काढले होते,  तर काहींना पूर ओसरल्यानंतर साफसफाई करण्यासाठीही मदत केली होती. त्यानंतर 14 ऑगस्ट रोजी त्याला ताप आला. सुरूवातीला त्याने हा साधा ताप असेल म्हणून औषधे घेतली. मात्र त्यानंतर हा ताप वाढतच गेला. त्यामुळे त्याला मुंबईतील अनेक रूग्णालयांमध्ये हलवण्यात आले. मात्र प्रकृती खालावल्याने दोन दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाला. त्याच्यावर शनिवारी वैजी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे पुरात अनेकांसाठी देवदूत बनलेल्या दीपकचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने दिव्यासह वैजी येथे हळहळ व्यक्त होत आहे.

मुलाचा पहिला वाढदिवसही झाला नाही

दीपक याला एक वर्षाचा सक्षम हा मुलगा आहे. त्याचा 14 ऑगस्ट रोजी पहिला वाढदिवस होता. मात्र त्याचदिवशी दीपक याची प्रकृती बिघडल्याने सक्षम याचा पहिला वाढदिवसही साजरा करण्यात आला नाही. त्यानंतर काही दिवसांतच दीपकचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे सक्षम वडिलांच्या प्रेमापासून पोरका झाला आहे. दीपक याच्या पश्चात वडील, पत्नी, भाऊ असा परिवार आहे.

 

Related posts: