|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » आमची जागरण संस्कृती

आमची जागरण संस्कृती 

आम्ही शाळेत असताना टाइम्स ऑफ इंडियाचे स्वरुप निराळे होते. शिक्षक लोक सांगायचे की नियमित टाइम्स वाचा. त्यातल्या अवघड शब्दांचे अर्थ शब्दकोशात पहा. म्हणजे तुमचे इंग्रजी सुंदर होईल. पण इंग्रजी सुधारण्यासाठी आमच्या पिढीला जेम्स बॉन्डचे वगैरे (फक्त प्रौढांसाठी असलेले) सिनेमे बघावेसे वाटत. पण चित्रपटगृहातील द्वाररक्षक संस्कृतीचे कट्टर अभिमानी आणि नियम पालनाच्या बाबतीत भलतेच कर्तव्यदक्ष होते. कॉलेजच्या शेवटच्या वर्षात पोचेतो आणि ओठांवर मिशा दृग्गोच्चर हाईतो आम्हाला जेम्स बॉण्डचे सिनेमे चालू असलेल्या चित्रपटगृहात प्रवेश मिळू शकला नाही.

नोकऱया लागल्यावर आम्ही इंग्रजी सिनेमे पाहू लागलो. अलका चित्रपटगृहात हे सिनेमे लागत. सिनेमे बघण्याचे एक शास्त्र होते. त्याचे काही उपचार होते. शनिवारी सकाळी लवकर जाऊन रात्रीच्या शोची तिकीटे बुक करायची संध्याकाळी सात-साडेसातला जेवणे उरकून एकेका मित्राला गोळा करायचे. मग रमतगमत चालत लक्ष्मी रस्त्यावरून अलकाकडे कूच करायचे.

सिनेमा बघितल्यावर आमचा चारित्र्यसंपन्न सन्मित्र हेमंत लगबगीने घरी जाई. आम्ही मात्र मंडईकडे कूच करायचो. मंडईसमोरचे ‘मार्केट भुवन’ रात्रभर उघडे असे. तिथे मिसळपाव खाल्याशिवाय सिनेमाची सांगता होतच नसे. तिथल्या मिसळीचा फार्म्युला हटके होता. एका गाडग्यात टपोरी चवळी, कांदा, लसूण, टोमॅटो आणि लाल तिखट घालून केलेला, तर्रीयुक्त लालबुंद आणि तिखटजाळ रस्सा, दुसऱया वाटीत पोहे-फरसाण, कांदा-कोथिंबीर, बशीमध्ये पावाचे दोन जाड स्लाईस. मिसळ खाऊन जठराग्नी तृप्त झाल्यावर थोडा वेळ जाऊ द्यायचा. जिभेला लागलेला चटका विरघळला की मग तिथला कडक स्पेशल चहा घ्यायचा नि रस्त्यासमोरच्या शेडमध्ये ठेवलेल्या भाजीच्या पोत्यांना टेकून चहा घेत गप्पा मारीत बसायचे. सिनेमावर चवीने बोलायचे. कंटाळा आला की लक्ष्मी रोडवर ‘ए वन रेस्टॉरंट’ मध्ये इराणी चहा. पूर्वेकडचे आकाश गुलाबी दिसायला लागले तरी गप्पा  संपत नसत. पण आता पाय बोलायला लागलेले असत आणि जिभा-पापण्या जड झालेल्या असत. आम्ही निमूट घरला जायचो.

सकाळ झालेली असे. आज रविवार आणि ऑफिसला सुट्टी, मग काय, अंथरुणात शिरायचे नि झोपेच्या मांडीवर डोके टेकून डोळे मिटून घ्यायचे. झोपेत काय काय स्वप्ने दिसायची. दुपारी उशिरापर्यंत कध्धीच जाग यायची नाही.

 

Related posts: