|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » माणसाला वाचवाया माणसे धावून आली!

माणसाला वाचवाया माणसे धावून आली! 

पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी ज्या कलावंतांचे हात पुढे सरसावले यात काही तरुण कवी-लेखकांचाही समरसून सहभाग होता. त्यांनी अशी कृती करून आपल्या मागील आणि पुढील पिढीतील साहित्यिकांसमोरही आदर्श ठेवला.

   

‘बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी’ अशी म्हण साहित्यिकांबद्दल प्रसिद्ध आहे. तरीही त्यांच्यातही कर्तव्यदक्ष माणूस दडलेला असल्याचे अनुभव येतच असतात. सांगली, कोल्हापूर, तळकोकण, चंदगड आणि बेळगाव आदी भागात पुराने होत्याचे नव्हते केले आणि अनेकांचे जगणेच उद्ध्वस्त झाले. पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी ज्या कलावंतांचे हात पुढे सरसावले यात काही तरुण कवी-लेखकांचाही समरसून सहभाग होता. त्यांनी अशी कृती करून आपल्या मागील आणि पुढील पिढीतील साहित्यिकांसमोर आदर्श ठेवला. या वर्षीचा युवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेता कवी सुशीलकुमार शिंदेने पुरस्काराची पन्नास हजाराची रक्कम पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री निधीत जमा केली तर पुण्याची कवयित्री पूजा भडांगे हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून अगदी परदेशातील लोकांपर्यंत पोहचून पूरग्रस्तांना भरीव मदत मिळवून दिलीच परंतु पूजाचे कौतुक हे की प्रत्यक्ष पूरग्रस्त भागासाठी तिने स्वतः तरुणाईची टीम उभी करून पूरग्रस्तांना सावरण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले. तरुण कवी नामदेव कोळी याने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगलीच्या पुरात पूर्णतः घर-संसार गमावलेल्या पाच कवी-लेखकांना अर्थ सहयोग देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. नाशिकचे कवी अजित अभंग, पुण्याच्या प्रकाशिका मोहिनी कारंडे, कणकवलीच्या कवयित्री रूपाली कदम अशा अनेक ज्ञात अज्ञात पूरग्रस्तांना मदत करणाऱया तरुण साहित्यिकांची नावे आपल्याला सांगता येतील. या सगळय़ांनी आपल्यातील संवेदनशीलता जागृत ठेवत त्यांनी ‘माणसाला वाचवाया माणसे धावून आली, धावली ना देवळे वा धावले दरबार नाही’ या कवी अशोक बुरबुरे यांच्या कवितेचा प्रत्यय दिला! त्याबद्दल या तरुणाईचे कौतुक करावे तेवढे थोडेच!

या तरुण साहित्यिकांनी पूर-परिस्थितीचे गांभिर्य ओळखून पुरात खचून गेलेल्या आपल्या साहित्यिक मित्रांना मदत केलीच परंतु इतर पूरग्रस्तांनाही भरीव मदत केली. या पुरात कवी रमजान मुल्ला, कथाकार हिम्मत पाटील, कथाकार संदीप नाझरे, कवी सुरेश मोहिते, कवी साहिल शेख या सांगली जिल्हय़ातील साहित्यिक मित्रांची घरेही पाण्याखाली गेली. त्याहूनही दु:खद म्हणजे त्याचे घरातील ग्रंथ संग्रहालय आणि कथा कवितांची हस्तलिखितेही जलमय झाली आहेत. पैकी रमजान मुल्ला यांना तर हा अनुभव तिसऱयांदा आला. तो म्हणतो, ‘एका पुराने मला कवी बनवलं, आणि दुसऱया पुराने कविता वाहून नेल्या’. या सर्व लिहित्या मित्रांची स्वतंत्र व्यथा आणि त्या दुःखाच्या अनेक कथा आहेत. ते आधीच व्यवस्थेने नाडलेले आहेत, कुणालाही नोकऱया नाहीत, तुटपुंज्या पगारावर ही माणसे आपला आणि कुटुंबांचा उदर निर्वाह करतात. या सगळय़ांसाठी निधी उभारण्याचा निश्चय नामदेव काळी या कवीने केला.  नामदेव म्हणतो, बांधीलकी म्हणून या मित्रांसाठी लोकवर्गणीतून थोडीफार आर्थिक मदत जमवता येऊ शकते का असा विचार भरत दौडकर, भास्कर बडे, जगदीश कदम, प्र्रभाकर साळेगावकर, अभिजीत पाटील या कवी-लेखकांच्या चर्चेतून पक्का झाला. त्यानुसार फेसबुकवॉलवरून तसे आवाहन केले. ते इतरही समाज माध्यमांतून सामायिक झाले, याचा परिणाम म्हणजे साहित्य क्षेत्रातील नवोदितांपासून ते मान्यवर साहित्यिकांनी या निवेदनाला सकारात्मक प्र्रतिसाद दिला. जवळपास 1 लाख 80 हजार रु. जमा झाले, त्याचे समांतर पाच भागात विभाजन करून प्रत्येकी 36 हजार रु. त्यांच्या बँक खात्यात वळते केले. अजूनही मदतीचा ओघ सुरूच आहे.

कवयित्री पूजा भडांगे हिची कहाणी खूपच करुण आहे. लग्नानंतर ती पहिल्यांदाच पुण्याहून बेळगावला माहेरी आली तर पुरात तिचे माहेरचे घरच पाण्याखाली असल्याचे तिला पहावे लागले. घरच्यांना सावरू की स्वतःला असा पेच तिला पडलेला असताना दोन दिवस स्वतःसाठी पोट भरून तिने रडून घेतले आणि चंदगडपासून खानापूर अशा अनेक गावातील नागरी जीवन पुरात उद्ध्वस्त झाले त्यांच्यासाठी मदतीचा हात द्यायचा निर्णय घेतला. पुढे महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या श्रीकांत कदम यांच्या सहकार्यातून पूजाने मुलांची फौज उभी केली. स्वतःच्या कोसळलेल्या घराला बाजूला ठेवून शेजाऱयांच्या आक्रोशाने तिला हलवून सोडले. तिने आपल्या सहकाऱयांना बरोबर घेऊन बेळगाव ते चंदगड अशा सर्वच भागातील पूरग्रस्तांना अर्थ सहयोगापासून प्रत्यक्ष वस्तु देण्यापर्यंत साऱया प्रकारची मदत करण्याला प्रारंभ केला. सोशल मीडियाच्या तिच्या आवाहनाला महाराष्ट्राबरोबरच थेट अमेरिका, बेंगलोर, इंदोर, दिल्ली, न्यूझीलंड, लंडन, सिंगापूर आदी भागातून मदत पाठवली गेली. दिवसात तिच्या अकाउंटला सुमारे लाख जमा झाले. 8 दिवसात गावे आणि पूरग्रस्त कुटुंबापर्यंत तिने मदत पोहचविण्याचे काम केले. पूजा म्हणते, ज्या बेळगाव-चंदगड रस्त्यावरून कधीही जाताना बासमती तांदळाच्या पिकांचा मंद वास यायचा त्याच रस्त्यावरून जाताना कुजलेल्या पिकांमुळे नाकावर रुमाल घ्यायची वेळ आली होती. पडलेल्या घरांमुळे गावेच्या गावे भयाण झाली आहेत, कुणी रडतो आहे तर कुणी रडून रडून निर्विकार झाला आहे. काही लोकांची सोय मंदिरात, लग्न कार्यालयात शाळेत केलेली आहे, पण पुढे काय असा प्रश्न मदत पोचवून येताना नेहमीच पडायचा. वृद्ध माणसांना बसलेला मानसिक धक्का तर न भरून निघण्यासारखाच! काही ठिकाणी तर शाळांचे इतक्मया मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले की 15 ऑगस्टला झेंडावंदन करायला बऱयाच विद्यार्थ्यांना शाळाच उरली नव्हती. पूजाने उभारलेल्या मदत कार्याचे मोल मोठे आहे. कारण सांगली-कोल्हापूर पुराच्या बातम्या चॅनेलवरून येत होत्या पण बेळगाव-चंदगड भागातील पुराची दखल फारशी घेतली गेली नव्हती. त्यामुळे किती आणि कशा प्रकारचे नुकसान झाले आहे याचा काहीच अंदाज येत नव्हता. मदत तर दूरच, पण दिलासा देण्यासाठीही इथल्या गावांपर्यंत कुणीच पोहचू शकले नव्हते. बऱयाच गावांमध्ये सर्वात आधी पोचली होती ती पूजा आणि तिची टीम. अर्थात साहित्य लेखनातून समाजाचे चित्र मांडताना लेखक-कवी प्रत्यक्ष समाजापासूनच दूर जात असतानाच्या या काळात पूजासारखी कवयित्री समाजासाठी असे काम करते तेव्हा ते काम समाजातील चांगूलपणाच टिकून ठेवण्याचे योगदान असते.

अजय कांडर

Related posts: