|Thursday, February 27, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » दहशतवाद्यांच्या घुसखोरीमुळे अतिदक्षता

दहशतवाद्यांच्या घुसखोरीमुळे अतिदक्षता 

तामिळनाडू, केरळमध्ये अलर्ट जारी : श्रीलंकेतून समुद्रमार्गे दहशतवादी घुसल्याचा संशय

चेन्नई / वृत्तसंस्था

दक्षिण भारतातील तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये पुन्हा एकदा अतिदक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत. कोईम्बतूरमध्ये समुद्रमार्गाने सहा दहशतवाद्यांनी भारतात प्रवेश केल्याची माहिती उपलब्ध झाल्यानंतर हा अलर्ट जारी करण्यात आला आहे. हे सहा संशयित दहशतवादी समुद्रमार्गे उत्तर श्रीलंकेतून रामेश्वरमार्गाने कोईम्बतूरमध्ये घुसले आहेत. या सहा दहशतवाद्यांपैकी एक इलियास अन्वर हा पाकिस्तानचा नागरिक असून इतर पाच जण श्रीलंकेतील तामिळी नागरिक असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, तामिळनाडूप्रमाणेच केरळ आणि कर्नाटक या राज्यांमध्येही सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.

लष्कर-ए-तोयबाचे 6 दहशतवादी सागरी मार्गाने तामिळनाडूत शिरल्याची माहिती समोर आली आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनंतर संपूर्ण राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांकडून संपूर्ण राज्यात कोम्बिंग ऑपरेशनही करण्यात आले. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार ते दहशतवादी संरक्षण संस्था, मंदिरे, पर्यटन स्थळ आणि विदेशी दुतावासावर हल्ला करू शकतात अशी शक्मयता वर्तवण्यात आली आहे.

दहशतवाद्यांची माहिती मिळवण्यासाठी सर्व जिल्हय़ांच्या आणि किनारपट्टीच्या भागातील यंत्रणा सक्रीय करण्यात आल्या आहेत. तसेच अधिकाऱयांना फेरीबोटींच्या जाण्या-येण्यावर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच मच्छीमारांनाही सतर्क राहण्यास सांगण्याच्या सूचना अधिकाऱयांना देण्यात आल्या आहेत. तसेच राज्यभरात शोध मोहीम सुरू राहणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

चेन्नई शहरात अतिरिक्त 2000 पोलीस तैनात

चेन्नईच्या पोलीस आयुक्तांनी शहरात अतिसतर्कतेचे आदेश दिले आहे. कोईम्बतूरमधील महत्त्वाच्या चौदा रस्त्यांवर नाकाबंदी करत सुरक्षितता वाढवण्यात आली आहे. संपूर्ण शहरात दोन हजार पोलीस गणवेशात आणि साध्या वेशात तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली. तसेच कोईम्बतूरला जाणाऱया राज्यातील 14 प्रमुख मार्गांवर सुरक्षा एजन्सी लक्ष ठेवून आहे.

Related posts: