|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » गणपती साधा पूरग्रस्तांना मदत हाच वादा

गणपती साधा पूरग्रस्तांना मदत हाच वादा 

सम्राट फेंड सर्कल झाडावरचा गणपती मंडळाचा निश्चय

प्रतिनिधी/ कोल्हापूर

कोल्हापुरात आलेल्या आस्मानी संकटात शहरासह जिल्हय़ातील अनेक कुटुंबांचे संसार महापुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. पुन्हा नव्याने संसार कसा उभा करायचा असा प्रश्न पूरग्रस्तांसमोर उपस्थित झाला आहे. त्यामुळे ‘गणपती साधा पूरग्रस्तांना मदत हाच वादा’ या संकल्पनेच्या माध्यमातून सम्राट फेंड सर्कल झाडावरचा गणपती मंडळाने पूरग्रस्तांना दीड लाखाची मदत करण्याचा निश्चय केला आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष मुकुंद पाटील यांनी दिली.

सम्राटनगर येथील सम्राट फेंड सर्कल झाडावरचा गणपती मंडळाच्या वतीने पूरस्थितीत जिव्हेश्वर हॉलमध्ये सवाशे लोकांसाठी निवारा केंद्र केले होते. या निवारा केंद्रातील पूरग्रस्तांना आठ दिवस चहा, नाष्टा, जेवण, कपडे, साबण, टूथपेस्ट, आंथरूण पांघरून आदींचा पुरवठा करण्यात आला. पुरात घर गेल्याचे दु:ख होतेच पण सम्राट फेंड सर्कलच्या कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांसाठी दिलेल्या सुविधा पाहून पूरग्रस्तांच्या डोळय़ात आनंदाश्रू आले. पूर ओसरल्य़ानंतर निवारा केंद्रावरून घरी जाताना पूरग्रस्तांनी जड अंतकरणाने या तरूण मंडळाचा निरोप घेतला. दरवर्षी गणपती महोत्सवात सामाजिक बांधिलकी म्हणून विधायक कार्य केले जाते. वृध्दाश्रमात फळे वाटप, गरजू विद्यार्थ्यांना वहय़ा वाटप यासह अन्य सामाजिक कार्य केले जाते. यंदाचा गणेश उत्सव साध्या पध्दतीने करून महाप्रसाद, सजावट, मिरवणूक आदी कार्यक्रमांचा दीड लाख रूपयांचा निधी पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. या पैशातून आंबेवाडी व प्रयाग चिखली येथील गरीब व गरजू पूरग्रस्तांना धान्य कीट, शेळी-मेंढी आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जाणार आहे. हातावरचे पोट असणाऱया एखाद्या पूरग्रस्ताला त्याच्या व्यवसायासंदर्भाती मशिनरीही देण्यात येणार आहे.

Related posts: