|Friday, February 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सोलापुरातील यंत्रमाग उद्योगालाही आर्थिक मंदीचा फटका

सोलापुरातील यंत्रमाग उद्योगालाही आर्थिक मंदीचा फटका 

संतोष कणमुसे/ सोलापूर

टॉवेल आणि चादरच्या माध्यमातून सोलापुरचे नाव साता समुद्रापलिकडे गेले असले तरी जगातील मार्केटमध्ये मंदीचे सावट पसरल्यामुळे याचा फटका भारतातील अनेक उद्योगांना बसला असून सोलापुरातील यंत्रमाग व्यवसायही यातून सुटलेला नाही. यंत्रमाग धारकांनी उत्पादित केलेल्या मालाला उठाव नसल्याने हा उद्योग संकटात आला आहे. मागच्या दीड वर्षापासून तीन हजार यंत्रमाग कारखान्यांची धडधड थांबली असून हा व्यवसाय सध्या सलाईनवर असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

सोलापुरला ज्या उद्योग नगरीने जगात प्रसिध्दी मिळवून दिली तो यंत्रमाग उद्योग आज जागतिक मंदीमुळे अडचणीमध्ये सापडला आहे. एकेकाळी गिरणगाव म्हणून ओळखल्या जाणाऱया सोलापुरातील कापड गिरण्या व सूतगिरण्या एका पाठोपाठ बंद पडल्यानंतर आता यंत्रमाग उद्योगापुरते सोलापुरच्या उद्योगाचे अस्तित्व कसेबसे शिल्लक राहिले आहे. पण आता आर्थिक मंदीचे सावट पसरु लागले यंत्रमाग उद्योग अडचणीत सापडला आहे, 30 टक्के उत्पादन घटल्याने हजारो कामगारांच्या नोकऱया जाण्याची शक्यता आहे.

यंत्रमाग उद्योगाच्या माध्यमातून जगप्रसिध्द सोलापुरी चादर व टेरी टॉवेलचे उत्पादन घेतले जाते. सोलापुरी चादरीला ब्रण्डनेम कायम आहे, तर दुसरीकडे येथील टेरी टॉवेलला परदेशात मागणी वाढत आहे, ही जमेची बाजु भक्कम असताना जागतिक मंदीने निर्यातही घटली तसेच देशांतर्गत मागणीही कमी झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्यामुळे यंत्रमाग उद्योगाला आधार मिळतो त्या सोलापुरी चादरीचे उत्पादन झपाटय़ाने कमी होत असून, सध्या 20 टक्केच सोलापुरी चादरीचे सोलापुरात उत्पादन घेतले जाते. बाहेरुन तयार होवून येणाऱया चादरींनाही सोलापुरी चादरी म्हणून विकल्या जातात. सध्या सोलापुरातील यंत्रमाग उद्योग टॉवेल उत्पादनावर तग धरुन आहे पण त्यालाही जागतिक मंदीचा फटका बसला आहे.

मंदीमुळे निर्यातही कमी झाली आहे, बांगलादेश, चीन, पाकीस्तान, व्हीएतनाम या देशांतील चादरी, टॉवेल भारतात येतात, चीनचा माल स्वस्त असल्याने चीनच्या चादरींना भारतात मागणी वाढली आहे. या देशांचा फटकाही सोलापुरच्या यंत्रमाग उद्योगावरती बसत आहे. या बाहेरील देशांसोबतची स्पर्धा, जागतिक मंदी, यामुळे येथील चादरींची मागणी कमी झाली आहे, मागील दोन वर्षापासून मागणी कमी होत आहे, सोलापुरातील 16 हजार यंत्रमागांची संख्या आता 13 हजारावरती आली, झपाटय़ाने यंत्रमाग कमी होत आहेत, आता चालू असलेल्या 13 हजार यंत्रमागावरील उत्पादन 30 टक्क्यांनी घटले आहे, यामुळे यंत्रमाग बंद ठेवून कामगारांना सुट्टी द्यावी लागत आहे. मागील दोन वर्षापासून तीन हजार यंत्रमाग बंद पडले.

सोलापुरात यंत्रमागावरती काम करणाऱया कामगारांची संख्या जवळपास 50 हजार एवढी आहे, येथील रोजगार याच व्यवसायावर अवलंबून आहे. दुष्काळात असलेला सोलापूर जिल्हा येथे उद्योग कमी असल्याने बेरोजगारांची संख्या जास्त आहे, चालू असलेल्या यंत्रमागावरती येथील तरुणांना रोजगार मिळतो याच यंत्रमाग व्यवसायावर मंदीमुळे अडचणी आल्या आहेत, यंत्रमागधारकांना उत्पादन बंद ठेवण्याची वेळ आली आहे. यामुळे मोठय़ा प्रमाणत तरुणांचे रोजगार जाणार असल्याचे बोलले जात आहे.

Related posts: