|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पूरस्थितीचं भान ठेवून उत्सव साजरे करा

पूरस्थितीचं भान ठेवून उत्सव साजरे करा 

प्रतिनिधी/ मिरज

संपूर्ण दक्षिण महाराष्ट्र महापूराच्या तडाख्यात सापडला आहे. यामुळे लाखो लोक बेघर झाले आहेत. हे लोक दुःखी असताना आपण आनंद कसा साजरू शकतो, याचा विचार प्रत्येकाने अंतर्मनाने करावा. यंदाचा मोहरम आणि गणेशोत्सव साधेपणाने करून पूरग्रस्ताचे अश्रू पुसूया, असे आवाहन जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांनी केले.

  गणेशोत्सव आणि मोहरमच्या पार्श्वभूमीवर महापालिका कार्यालयात आयोजित गणेश मंडळांचे कार्यकर्ते, शांतता कमिटी सदस्य व पदाधिकारी यांची बैठक झाली. यावेळी शर्मा मार्गदर्शन करत होते. यावेळी अतिरिक्त अधीक्षक डुबुले, उपाधीक्षक संदीपसिंह गिल, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, उपायुक्त स्मृती पाटील, तहसीलदार शरद पाटील, पोलीस निरीक्षक राजू ताशीलदार उपस्थित होते.

  सुहेल शर्मा म्हणाले, यंदाच्या गणेशोत्सव आणि मोहरम या सणांना महापूराची पार्श्वभूमी आहे. जिल्हय़ातील लाखो लोकांचे संसार पाण्याखाली बुडाले. ते बेघर झाले. त्यांच्या डोक्यावर छप्पर नाही. लहान मुलांना शाळेसाठी वहय़ा-पुस्तके नाहीत. आपलेच हे बांधव दुःखात असताना आपण उत्साहात सण साजरे करणे कितपत योग्य आहे? दरवर्षी आपण गणेशोत्सवात आनंदाने नाचतो-गातो. मात्र, यंदाच्या उत्सावाला आपल्याच बांधवर ओढवलेल्या दुःखाची किनार आहे. याचे भान सर्वांनी ठेवावे. आपल्या अंर्तमनाला साद घालावी. दुःखहर्ता असा जो गणेश आहे, त्यालाही आपले शेकडो भक्त संकटात असताना त्याचा उत्सव जल्लोषात केलेले आवडणार नाही. त्यामुळे गणेशभक्तांनी यंदाच्या उत्सवांत भान ठेवून समाजाला एक आदर्श घालून द्यावा.

  यावेळचा उत्सव हा पोलीसमुक्त असावा, पोलिसांना कायद्याचा बडगा उगारण्याची स्थिती न आणता, हे सण साजरे करा, असे आवाहन शर्मा यांनी केले. यावेण गजेंद्र कल्लोळी, सुनील चिप्पलकट्टी, आसगर शरीकमसलत, मनोहर कुरणे, मुस्तफा बुजरूक, आप्पा नाईक, निहाल शरीकमसलत, सुर्यकांत शेगणे, शंकर परदेशी यांनी विविध विषयावर प्रश्न उपस्थित केले. सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक राजू तासीलदार यांनी केले.

Related posts: