|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » चिनी बोटी महिनाअखेर सोडणार दाभोळ

चिनी बोटी महिनाअखेर सोडणार दाभोळ 

वार्ताहर/ दाभोळ

गेल्या अडीच महिन्यांपासून दापोली तालुक्यातील दाभोळ खाडीपट्टय़ात उभ्या असलेल्या चीनच्या 8 बोटी महिनाअखेरपर्यंत दाभोळ सोडणार असल्याचे बंदर विभाग व सागरी पोलीस स्थानकाकडून स्पष्ट करण्यात आले. वादळी वारे व प्रतिकुल हवामानामुळे या बोटींनी दाभोळ खाडीत आश्रय घेतला होता.

  दाभोळ येथे नुकत्याच झालेल्या भारतीय तटरक्षक दलाच्या कार्यक्रमात तटरक्षक दलामध्ये विद्यार्थ्यांना असणाऱया संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. याचवेळी  सागरी सुरक्षेंतर्गत दाभोळ खाडीत असणाऱया आठ चिनी बोटींबाबत प्रश्न विचारला असता उपस्थित अधिकाऱयांनी ही माहिती दिली. त्यानुसार हा बोटी येत्या काही दिवसांमध्ये दाभोळ किनारा सोडणार आहेत.

   या प्रकरणी कोणतीही शंका घेण्याची किंवा काळजी करण्याची गरज नाही. चीनमधील ओशियन स्पार्कल फिशिंग  कंपनीच्या या बोटी असून चीन, फिलीपाईन्स व इंडोनेशियन देशाचे 131 कर्मचारी या बोटींवर काम करत आहेत. चेन्नईमधील एचएसएम या सर्व्हीस कंपनीने बोटींच्या कागदपत्रांच्या पूर्ततेची जबाबदारी घेतलेली होती. एचएसएम कंपनीने स्थानिक पातळीवरील काम रत्नागिरीतील युनिक मरीन सर्व्हीसला दिले. मात्र युनिक मरीन सर्व्हीसच्या ढिसाळ कामामुळे त्यांचा मुक्काम वाढल्याचे अधिकाऱयांनी सांगितले.

  यावेळी दाभोळ सागरी पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पवार, दाभोळ बंदर निरीक्षक महानवर, मत्स्य विभागाचे परवाना अधिकारी संतोष देसाई, कोस्टगार्डचे अधिकारी संजय वारे, भूमेश्वर पारधी आदी उपस्थित होते. दाभोळ खाडीपट्टय़ामध्ये या चीनी बोटींचा गेल्या अडीच महिन्यांपासून उपद्रव सुरू आहे. मात्र पोलीस, बंदर विभाग, मत्स्यखाते, कोस्टगार्ड, नेव्ही, कस्टम विभाग याबाबत ठोस निर्णय घेत नसल्याने ग्रामस्थांतून आश्चर्य व्यक्त होत आहे. वादळी वारा तसेच खवळलेल्या समुद्रामुळे आश्रयासाठी चिनी कंपनीच्या या 8 बोटी दाभोळ खाडीपात्रामध्ये दाखल झाल्या होत्या.

Related posts: