|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » ऐन चतुर्थीत खाणपट्टा उदासिन

ऐन चतुर्थीत खाणपट्टा उदासिन 

प्रतिनिधी/ पणजी

उत्सवी असलेली गणेश चतुर्थी जवळ आली आहे, मात्र आर्थिकदृष्टय़ा कमकवूत बनल्याने सध्या खाणपट्टय़ात मोठी उदासिन स्थिती आहे. खाण व्यवसाय मागील काही वर्षे बंदच आहे. त्यामुळे खाण व्यवसायाशी संबंधित लोक आर्थिकदृष्टय़ा प्रचंड अडचणीत आले आहेत. आता तर कंपनीत कामाला असलेल्यांनाही घरी बसविले आहे. त्यांनाही अर्धा पगार दिला जात आहे.

खाणपट्टय़ात सध्या मोठी आर्थिक विवंचना आहे. उत्तर आणि दक्षिण गोव्यातील मिळून बरीच कुटुंबे खाण व्यवसायावर अवलंबून आहेत. 2012 पासून राज्यातील खाण व्यवसाय अडचणीत आहे. खाण बंदीमुळे अवलंबून असलेले लोक अडचणीत आले आहेत. खाण संबंधित व्यवसायांवरच ही पुटुंबे अवलंबून असल्याने आर्थिक स्रोत पूर्णपणे बंद झाले आहेत.

राज्यात सध्या चतुर्थीची धामधूम सुरु आहे. चतुर्थी हा उत्सवी सण आहे. मात्र आर्थिकदृष्टय़ा कंगाल बनल्याने खाणपट्टय़ातील लोकांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. चतुर्थीचा खर्च कसा करावा ही मोठी चिंता लोकांना आहे. साहित्य खरेदी, कपडे खरेदी, माटोळी, कडधान्य यासाठी मोठा खर्च येतो. गणेशमूर्ती आणण्यापासून चतुर्थी होईपर्यंत सर्व गोष्टी आर्थिक खर्चावर अवलंबून आहेत. मागील काही वर्षे खाण व्यवसाय बंदच आहे. त्यामुळे लोकांची आर्थिक स्थिती पूर्णपणे खालावली आहे.

खाणपट्टय़ातील लोक गर्भगळीत अवस्थेत आहेत. खाणी सुरु करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार या आशेवर लोक राहिले. मात्र 2012 ते आतापर्यंत खाण व्यवसाय पूर्ण ताकदीने सुरु होऊ शकला नाही. खाण अवलंबित आज कर्जबाजारी बनले आहेत. त्याचबरोबर कोणतेही आर्थिक पाठबळ राहिलेले नाही. मागील काही वर्षे हिच स्थिती आहे पण आता दिवसेंदिवस स्थिती अधिक बिकट होत आहे.

Related posts: