|Tuesday, September 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पूरग्रस्तांच्या मदतीवर कारभाऱयाचा डल्ला

पूरग्रस्तांच्या मदतीवर कारभाऱयाचा डल्ला 

वार्ताहर/निपाणी:

महापुराच्या तडाख्याने नदीकाठच्या गावांना मोठा फटका बसला. अनेकांचे क्षणात होत्याचे नव्हते होऊन संसार उघडय़ावर पडले. अशा पूरग्रस्तांचे माणुसकीतून अश्रू पुसण्यासाठी अनेक हात पुढे आले. सामाजिक संस्था, देणगीदारांनी धान्य, कपडे, शुद्ध पाणी, ब्लँकेटसह अनेक वस्तू देऊन त्यांना जगण्याचे बळ दिले. अजूनही हा मदतीचा ओघ पूरग्रस्त गावात सुरु आहे. असे असताना पूरग्रस्तांसाठी आलेल्या मदतीवर ग्रामपंचायत सदस्याच्या कारभारी भावाने डल्ला मारल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. जत्राट ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घडलेल्या या प्रकाराबाबत युवा कार्यकर्त्यांनी बसवेश्वर चौक पोलीस ठाण्यात तक्रार केली असून, कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानंतर जत्राट येथे देणगीदारांच्या मदतीचा ओघ सुरु झाला. सरकारी प्राथमिक शाळेत पूरग्रस्तांच्या निवासाची सोय केली गेली. याच ठिकाणी पूरग्रस्तांना येणाऱया मदतीचे वितरणही सुरु झाले. याच संधीचा फायदा उठवत काही साहित्य नंतर वितरण करण्याच्या बहाण्याने शाळेच्या एका वर्गखोलीतच ठेवण्यात आले.

गुरुवारी वर्गखोलीत ठेवण्यात आलेले साहित्य विद्यार्थ्यांसाठी अडचण होत आहे. यासाठी हे साहित्य सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी घेऊन जा असे मुख्याध्यापकांनी ग्रामपंचायतीला सांगितले. हे सांगताच ग्रामपंचायत सदस्याचा भाऊ जो कारभारी म्हणून वावरतो, त्याने ग्रामपंचायत कर्मचाऱयांच्या मदतीने नव्याने घेतलेल्या घंटागाडीतून चेंडके मळय़ातील महादेव केरुरे-रेंदाळे यांच्या घरी नेऊन ठेवले. हे साहित्य पूरग्रस्तांना वितरीत करणे आवश्यक असताना कुठे नेण्यात आले, याचा युवा कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांनी तपास सुरु केला.

शनिवारी या युवा कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीत जाऊन विकास अधिकारी व कर्मचाऱयांना जाब विचारला. पण कोणाकडूनच समर्पक उत्तर मिळाले नाही. धान्य व साहित्य नेले, पण कुठे व कोणाच्या सांगण्यावरून नेले, हे सांगण्यास टाळाटाळ सुरु केली. यावर ग्रामस्थांनी विकास अधिकारी व कर्मचाऱयांच्या विरोधातच पोलिसात तक्रार करु, असा इशारा दिला. पोलिसांत तक्रार दाखल होणार हे सांगताच कर्मचाऱयांनी हे काम आपल्याला दत्ता हावाण याने सांगितले होते, असे कबूल केले.