|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » तिहेरी तलाकबंदी कायद्यानंतरचा पहिला एफआयआर बेळगाव जिल्हय़ात

तिहेरी तलाकबंदी कायद्यानंतरचा पहिला एफआयआर बेळगाव जिल्हय़ात 

प्रतिनिधी /बेळगाव :

तिहेरी तलाक बंदी कायदा अस्तित्वात आल्यानंतर कर्नाटकात या संबंधीचा पहिला एफआयआर दाखल झाला आहे. 22 ऑगस्ट रोजी सौंदत्ती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाल्याची माहिती शनिवारी जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी दिली. यकुंडी (ता. सौंदत्ती) येथील बेबीआएशा इस्माईलखान पठाण (वय 23) या महिलेने पती इस्माईलखान याच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. इस्माईलखानने दिलेला तलाक बेकायदा असल्याचे तिने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. 

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तिहेरी तलाक बंदी कायदा लागू झाल्यानंतर दाखल झालेला हा पहिला एफआयआर आहे. इस्माईलखान पठाण हा गोव्यात राहतो. त्याच्याविरुद्ध तिहेरी तलाकबंदी कायदा 2019 कलम 4 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेबीआएशाचे माहेर सौंदत्ती तालुक्मयातील यकुंडी येथील आहे. मूळचा बेळगावचा व सध्या गोव्यात राहणाऱया इस्माईलखान पठाणबरोबर 2 जानेवारी 2017 रोजी तिचे लग्न झाले. बेळगाव येथे हा विवाह झाला होता. त्यानंतर ते गोव्यात राहतात. केवळ 10 महिन्यात आपल्या आजारावर उपचार करुन घेऊन ये, असे सांगत पतीने बेबीआएशाला माहेरी पाठविले. अनेक डॉक्टरांना दाखविले असून आपणाला  काहीच झालेले नाही, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. आपले आरोग्य ठिक आहे. आता आपल्याला गोव्याला घेऊन जा, असे बेबीआएशाने पतीला सांगितले. तसेच तिच्या कुटुंबीयांनीही त्याला घेऊन जाण्यास सांगितले. मात्र तू आजारी आहेस म्हणून तुला तलाक देणार आहे. असे पतीने सांगितले होते.

22 फेब्रुवारी 2019 रोजी रजिस्टरएडीच्या माध्यामतून तलाक-ए-बिन पाठविण्यात आला. यामध्ये तलाक दिल्याचे सांगत महर व इदत्तची रक्कम म्हणून 17 हजार 786 रुपयांचा डीडी पाठविल्याचाही पत्रात उल्लेख करण्यात आला होता. हा तलाक बेकायदा असल्याचे सांगत बेबीआएशाने सौंदत्ती पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे.

Related posts: