|Friday, February 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पणजीत 27 रोजी विशेष चित्र प्रदर्शनाचे आयोजन

पणजीत 27 रोजी विशेष चित्र प्रदर्शनाचे आयोजन 

प्रतिनिधी /पणजी :

ऍपल प्रॉडक्शनतर्फे गोमंतकीय तैल चित्रकार तथा शिल्पकार संजय हरमलकर यांच्या 60व्या वाढदिवसाचे औचित्य साधून दि. 27 रोजी सायं. 4 वा. इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात विशेष चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती ऍपल प्रॉडक्शनचे शांताराम प्रभू यांनी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात संजय हरमलकर यांनी साकारलेल्या विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या व अन्य व्यक्तिचित्रांच्या प्रदर्शनाला सुरूवात होईल. गोवा कला महाविद्यालयाचे प्राचार्य तथा ज्येष्ठ चित्रकार दत्ता नावेलकर यांच्याहस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. प्रदर्शनात हरमलकर यांच्या निवडक 40 चित्रांचा समावेश आहे अशी माहिती प्रभू यांनी यावेळी दिली. दुसऱया सत्रात संजय हरमलकर यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंवरील ‘व्यक्तीरंग’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. यावेळी दत्ता नावेलकर, कला महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य महश वेंगुर्लेकर व अन्य मान्यवर उपस्थित असतील. ज्येष्ठ समीक्षक डॉ. सोमनाथ कोमरपंत या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते असतील. सुदेश वेर्लेकर यांनी संपादित केलेल्या या पुस्तकात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या लेखांचा समावेश आहे. तिसऱया सत्रात हिंदी सिनेसंगीतात आपल्या दर्दभऱया आवाजातील गीतांनी अनेक पिढय़ांचे भावविश्व समृद्ध केले त्या मुकेश यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या गीतांच्या सादरीकरणाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात स्वतः हरमलकर हे काही गीते सादर करतील असे प्रभू यांनी सांगितले.

संजय हरमलकर यांच्या व्यक्तिचित्रांचे प्रदर्शन दि. 29 रोजीपर्यंत रसिकांसाठी खुले राहील. हा संपूर्ण कार्यक्रम रसिकांसाठी खुला असून त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे असेही त्यांनी सांगितले.

 

Related posts: