|Thursday, September 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » किरण ठाकुर यांनी व्यक्त केले दुःख

किरण ठाकुर यांनी व्यक्त केले दुःख 

अत्यंत विद्वान, हुषार आणि बुद्धिवान नेता

प्रतिनिधी /पणजी :

माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनाने तरुण भारतचे समुह प्रमुख व  सल्लागार संपादक किरण ठाकुर यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

तरुण भारतच्या गोव्यातील पर्वरी येथील प्रिटिंग प्रेसचे उद्घाटन अरुण जेटली यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यांच्याबरोबर तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे उपस्थित होते. त्यावेळी अरुण जेटली हे केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री होते. त्यांनी दैनिक तरुण भारतचा इतिहास व वृत्तपत्राची परंपरा यासंदर्भातील संपूर्ण प्रदर्शन पाहिले. आपल्याशी त्यांनी सविस्तर व दिलखुलास चर्चाही केली होती.

पर्वरीच्या प्रिटिंग प्रेसचे उद्घाटन करताना हे वृत्तपत्र गोव्यातले क्रमांक एकचे वृत्तपत्र ठरेल, असे सुतोवाच त्यांनी केले होते. अर्थात ते खरेच ठरले.

आपण अरुण जेटली यांना भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकी दरम्यान हॉटेल मेरियॉट येथे पणजीत भेटलो होतो. त्यावेळी देखील त्यांनी दिलखुलास गप्पा मारल्या व अलिकडे वित्तमंत्री असताना ते गोव्यात आले होते, त्यावेळीही त्यांना भेटण्याचा योग आला होता. अत्यंत विद्वान, हुषार आणि एखाद्या निर्णयाशी ठाम राहणारे आणि निर्णय घेण्याची क्षमता असलेला हा बुद्धिवान नेता गेल्याने या देशाचे फार मोठे नुकसान झाले आहे, अशा शब्दात किरण ठाकुर यांनी आपली श्रद्धांजली वाहिली.