|Sunday, February 23, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » मन करारे प्रसन्न !

मन करारे प्रसन्न ! 

कुणालाही आपण विचारू की तू इतकी धावपळ का करतो आहेस,  तर उत्तर काय येईल? खरेतर हाच प्रश्न आपण स्वत:ला विचारला तर आपण काय उत्तर देऊ ? आपल्यासह सगळेजण एकच उत्तर देतील ‘अहो, कशाला म्हणून काय विचारता, आम्हाला बस्स सुख पाहिजे आहे!’ यात चुकीचे काहीच नाही. सारी धडपड, सगळेच सुख मिळावे म्हणूनच करतात. आता पुढचा प्रश्न असा की पूर्ण सुखी कोण आहे? याचे उत्तर मात्र वेगवेगळे येईल. कुणी म्हणेल की पूर्ण नसलो तरी बऱयापैकी सुखी आहोत, तर कुणी म्हणेल, कसले सुख घेऊन बसलात, आमच्या नशिबातच सुख नाही. पूर्ण सुखी आहोत असे कुणीच म्हणणारे भेटणार नाही. ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे?’ हा समर्थ रामदासांनी विचारलेला प्रश्न आपणही विचारत, उच्चारत असतो. कुणीच ‘सर्वसुखी’ नसेल तर मग ही धडपड, धावपळ आपण सगळे का करतो आहोत, अध्यात्मात याचे उत्तर मिळू शकते.

  प्रत्येक जीव सुखरूपच आहे. अज्ञानाने त्याला याचे विस्मरण झाले आहे. सुख पाहिजे असणे म्हणजे खरेतर स्वत:च स्वत:चा शोध घेणे आहे. पण अज्ञान (मायाही म्हणू शकतो) आडवे येते आणि ऊर फुटेपर्यंत आपण पळत सुटतो. अनेक वृत्ती-प्रवृत्ती आपल्या आत धिंगाणा घालत असतात. प्रत्येक वृत्ती-प्रवृत्तीला सुख पाहिजे असते म्हणून हाती लागेल त्यात त्या सुख शोधत असतात. पण त्यांना यश लाभतच नाही. का बरे? साधे कारण आहे. साऱया वृत्ती विस्कटलेल्या, सैरभैर पळणाऱया असतात. त्या जर व्यवस्थितपणे एकवटून घेतील तर सुख त्यांना त्यांच्या दारातच उभे असलेले दिसेल. ‘तुझे आहे तुजपाशी परी तू जागा चुकलाशी !’ हेच परम सत्य आहे. ज्या सुखाला आपण बाहेर शोधतो ते मुळात बाहेर नसतेच नसते. ते काठोकाठ आतच भरलेले आहे. शोधाची दिशाच चुकली तर जन्मभर धावून-पळून हाती काहीच लागणार नाही.

  एका गल्लीत मुले लपाछपीचा खेळ खेळत असतात. लपंडाव, एका मुलावर राज्य आलेले असते. तो भिडूला शोधत असतो. दमून थकून जातो तरी भिडू काही सापडत नाही. अगदी रडवेला होऊन जातो तो मुलगा. तेवढय़ात एक साधूबाबा तिथे येतात. रडवेल्या मुलाला बघून ते थांबतात. मुलाला विचारतात, ‘बाळ, काय झाले? तू चुकला आहेस का? घराचा रस्ता सापडत नाही का?’ मुलगा सांगतो, ‘नाही महाराज, मी चुकलो नाही. आम्ही लपंडाव खेळतो आहोत. पण मला माझा भिडू सापडतच नाही आहे. खूप प्रयत्न केला. कुठे दडून बसला आहे, देव जाणे!’ साधूला हसू येते. ते म्हणतात, ‘मी सांगतो तसे कर. पहिल्यांदा भिडूला शोधणे थांबव. ही घालमेल थांबव. इथे एका जागी उभा राहा. भिडू सापडेल!’

ठायीच बैसोनी करा एक चित्त!

  मुलाला पटले नव्हतेच. त्याच्या मनात आले, इतके शोध-शोध शोधले पण हाती काही लागले नाही. आता हे महाराज म्हणतात ते करून बघू. तो अगदी शांत उभा राहिला. हालचाल नाही की आवाज नाही. काही काळ असाच गेला. लपलेल्या भिडूला वाटले, आपला मित्र घरी निघून गेलेला दिसतो आणि तो लपलेल्या ठिकाणाहून बाहेर आला. बाहेर आला तोच थेट ‘राज्य असलेल्या’ मित्रासमोर! अनायासेच हाती लागला की. साधू हसले. भिडू हसला. शोध घेणाराही हसला. जणू सगळय़ांनाच सुख सापडले आहे. संत हेच सांगतात की एका ठिकाणी शांत राहा. एकचित्त करून आवडीने ‘अनंत’ आळवावा. तुकोबाराय म्हणतात की ‘न लगती सायास । जावे वनांतरा । सुखे येतो घरा । नारायण ।।’ हे ठायीच बसणे म्हणजे निष्क्रीयता नाही. आपल्या साऱया वृत्ती आत एकवटूनच सुखाची प्राप्ती होऊ शकते. नारायण म्हणजेच ‘सुख’. जे आतच आहे ते बाहेर कितीही शोधले तरी सापडणे कसे शक्मय आहे? मला नेहमी मुल्ला नसिरुद्दिनची गोष्ट आठवते. अंगणात तो ‘सुई’ शोधत असतो. पार वैतागून जातो शोधून पण सुई काही सापडत नाही. मग चिडचिड. तडफड. शेजारी विचारतो, ‘मुल्लाजी, काय शोधता आहात?’ मुल्लाजी म्हणतात, ‘सुई शोधतो आहे माझी’ शेजारी म्हणतो, ‘नक्की कुठे पडली होती?’ मुल्लाजी सांगतात, ‘पडली होती आत घरात, पण तिथे अंधार असल्याने इथे, बाहेर शोधतो आहे!’ यावर हसावे की रडावे हे शेजाऱयाला कळले नसणार. मला खात्री आहे की शोधायचा असा प्रसंग त्या शेजाऱयावर आला तर तोही बाहेरच शोधत असणार….सुखाची सुई!

  सुख बाहेर असते तर एव्हाना ते सापडायला पाहिजे होते. राहायला साधेसेच घर मिळाले की आपण सुखी होऊ असे वाटणाऱयाचा महाल होतो आणि तरी तो सुखी होईलच याची खात्री नाही. वस्तूत सुख शोधाणारे वस्तूंचा लाभ झाला तरी सुखी होतातच असे दिसत नाही. हवे हवेची हाव संपतच नाही. आयुष्य संपते तरी ‘एवढे एक मिळते तर खरेच सुखी झालो असतो’ ही कामना माणसाला पोखरतच राहते. प्रपंच सतत जमवायला सांगतो. नुसते सांगतच नाही पळायलाही लावतो. पळणे महत्त्वाचे नसते तर कळणे महत्त्वाचे असते. हे कळेपर्यंत जगणे संपायला येते तरी सुखाचा संप काही संपत नाही.

    आता दिशा बदलायला हवी

  पिढी दर पिढी सुख बाहेर शोधून हाती काही लागत नाही. किती पिढय़ांनी हा अनुभव घेतला. दमलो थकलो तरी वृत्तींचे हे बाहेर धावणे काही संपत नाही. पण बाहेरचे भानही नसणारे संत महात्मे मात्र सुखी होतात, कारण त्यांना कळलेले असते की जे मला शोधायचे आहे ते माझ्या आतच आहे. नुसते आत आहे एवढेच नाही, तेच तर आपले खरे स्वरूप आहे. त्यामुळेच ते पळणे थांबवतात. शांत बसतात. ते बसणे ध्यान असते. ध्यानात स्वत:चा शोध लागतो. सुख म्हणजेच हे स्वरूपाचे भान. हे भान आले की शोधणे थांबते. कस्तुरीच्या गंधाने वेडे होऊन आपण धावत निघालो. रानोमाळ त्या कस्तुरीचा शोध घेतला, पण व्यर्थ, आणि मग शोध लागतो की कस्तुरी बाहेर नाहीच, आत आहे. आपणच आहोत ती कस्तुरी! हे उमगले की सुखाचे शतदल कमळ उमलून येते. आत-बाहेर मग सुखाचा महापूर दाटून येतो. केवढे सोपे, तरी कळायला किती वेळ लागतो ना! बस्स, फक्त मन प्रसन्न करण्याचाच अवकाश, स्वानंद साम्राज्याचे आपण सम्राट होतो. मन प्रसन्न करायचे म्हणजे मनाला पाहिजे ते देणे नव्हे! मग आतल्या ईश्वराभिमुख करणे! बाहेर धावणाऱया वृत्ती एकवटून आत वळवल्या की मन प्रसन्न होते. आतली सुखाची दौलत मिळाली की आसक्तीचा जोर कमी होतो. एक अद्भूत ज्ञान होते की सुख माझ्यातच आहे. नव्हे, मीच सुख आहे. चला, स्वत:चा शोध घेऊन सुखी होऊया!

Related posts: