|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » जेथें निवास जगन्नायका

जेथें निवास जगन्नायका 

एकनाथ महाराज वर्णन करतात- द्विज पावला द्वारका ।  वैकुंठ कैलासांहूनि अधिका ।  जेथें निवास जगन्नायका । विश्वव्यापका श्रीकृष्णा । सुदेव द्वारकेला पोहोचला. जगाचा नायक, विश्वव्यापी श्रीकृष्णाचे निवासस्थान असलेली द्वारका ही वैकुंठ, कैलासाहूनही श्रे÷ आहे.  कवी नरेंद्र पुढे वर्णन करतात-त्या कृष्णनगरी द्वारकेला मुक्तीनगरी मानून सुदैवाने साष्टांग दंडवत घातला. जरासंधाच्या सैन्याला तोंड देण्यासाठी श्रीकृष्णाने विश्वकर्माकडून पश्चिम समुद्रावर द्वारका पट्टण वसविले होते. एका बाजूने रैवतक पर्वत व दुसऱया बाजूने सागर अशी नैसर्गिक तटबंदी त्या नगरीला लाभली होती. एका बाजूने समुद्र व दुसऱया बाजूने खंदक होता. वरुण देवतेचा पलंग असावा असा तो खंदक विस्तृत होता. ब्रह्मांड व्यापून उरलेले पाणी त्या खंदकात कृष्णाच्या भेटीला आले होते. भोवतालचा समुद्र विशाल व भयानक होता. जणू प्रलयमेघांनी तेथे वस्ती केली होती. त्या सागरात पर्वताएवढय़ा उंच लाटा उसळत. मध्येच त्यात भोवरे गरगरत. मध्ये उसळी मारून खळखळ पाणी वर उठे. मध्ये उकळत असल्याप्रमाणे खाली वर होई. मध्येच हळुवार लाटांचे नृत्य सुरू होई. मध्येच कारंजासारख्या धारा उसळत. पाण्यातील जलचर एकमेकांवर गुरगुरत. त्यांचा आवाज आकाशातील ढगांच्या गडगडासारखा वाटे. सुसरी, मगरी, नानाप्रकारचे मासे व जलचर मधून मधून उडय़ा मारीत. त्या उडय़ा इतक्मया उंच असत की आकाशातील नक्षत्रांची आमिषके त्यांच्या तोंडात येतील. या समुद्रात होडय़ा, जहाजे, तारवे, तराफे या जलवाहनांची रेलचेल होती.                                                    वडिलांच्या कडेवर लहान मुल शोभावे तशी समुद्राच्या कडेवर द्वारका नगरी शोभत होती. सुदेवाने तो क्षितिजापर्यंत पसरलेला समुद्र पाहिला. समुद्राच्या पाण्याचा निळा वर्ण श्रीकृष्णाच्या निळय़ा रंगाशी स्पर्धा करत होता. नगरीच्या चौफेर वने होती. जणू आकाशाने मेघांची वीण घातली असावी, अशी वने शोभत होती. प्रमदवने, आरामबागा, उपवन, क्रीडावने अशी सर्व वने होती. पूर्वेला सुधावन होते. आग्नेय दिशेला विलासवन होते. दक्षिण दिशेला राजवने होती. नैर्त्रुत्येला क्रीडावन होते. वायव्येला कंदर्पवन होते. पश्चिमेला लक्ष्मीवन होते. उत्तरेला अफाट असे वसंतवन होते. ईशान्येला सुंदर शृंगारवन होते. जणू काय श्रीकृष्णाची सेवा करण्यासाठी आठ लोकपालांनी आठ वने पाठवली होती. याशिवाय शेकडो बागा होत्या. त्यांच्या रचना रसिकांच्या मनाला आनंद देणाऱया होत्या. या वनात तऱहेतऱहेचे असंख्य वृक्ष होते. कैलास, नंदनवन, सत्यलोक, वैकुंठ येथेही जी झाडे नाहीत, ती झाडे द्वारकेच्या उद्यानात होती. जणू झाडाच्या रुपाने आपल्याला मुक्तीचा आनंद मिळेल हे जाणून देवच तरुचा वेश घेऊन द्वारकेच्या बागेत आले होते. त्या उद्यानात ऋतुराज वसंत बाराही महिने विराजत होता. वसंताबरोबर भ्रमर, कोकिळा, हंस, चकोर, चक्रवाक हे द्विजगण, आम्रमंजिरी, मदनबाण, मधुमालती, मोगरा, जाईजुई ही सारी पुष्पसृष्टी म्हणजे वसंताचा परिवार द्वारकेच्या बागेत अवतरला होता.

Ad.  देवदत्त परुळेकर

Related posts: