|Thursday, January 23, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » अरुणास्त

अरुणास्त 

भाजपचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री विख्यात विधिज्ञ अरुण जेटली यांचे शनिवारी निधन झाले आणि राजकारणातील एक स्वयंप्रकाशित व्यक्तिमत्वाची अखेर झाली. जणू अरुणास्त झाला. भाजपाला सत्ता आणि समर्थन मिळवून देणारा एक बुद्धिवान नेता काळाआड गेला. अटलजी, मनोहर पर्रीकर, सुषमा स्वराज या माळेतील आणखी एक फूल गळाले. साहजिकच भाजपाला, देशाला आणि आपल्या बुद्धिवैभवावर राजकारणात स्वत:चे स्थान निर्माण करू पाहणाऱया अनेकांना धक्का बसला आहे. अरुण जेटली यांनी लोहोर मधून वडिलांचे बोट धरुन दिल्लीत प्रवेश केला. शालेय, महाविद्यालयीन शिक्षण राजधानीत पूर्ण केले. महाविद्यालयीन जीवनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी त्यांचा संबंध आला आणि या विद्यार्थी संघटनेचे ब्रीद म्हणजे ज्ञान, चारित्र्य व एकता हीच त्यांची जीवनविद्या बनली. मुखात सरस्वती होती, अफाट वाचन आणि बुद्धी होती. आणीबाणीच्या काळानंतर जनता पक्षाची स्थापना झाली त्यामध्ये या वाणीला संधी मिळाली आणि दिल्ली परिसरात आणि युवकांच्या व्यासपीठावर या वाणीने गारूड घातले. ओघानेच जनता पक्ष आणि पुढे भारतीय जनता पक्षात स्थापनेपासून या युवकाला महत्त्व आले आणि विद्यार्थी परिषदेप्रमाणे भाजयुमो आणि भाजपात विविध जबाबदाऱया पडल्या. संपूर्ण क्रांतीसाठी जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली आवाज उठवणारे अरुण जेटली भाजपचे नेते झाले. अरुण जेटली यांनी भाजपाला सत्तेवर आणण्यासाठी आणि भाजपाच्या आणि रा. स्व. संघ विचारधारेच्या वृद्धीसाठी त्यांनी मोठी मेहनत घेतली. पक्षाचे संकटमोचक अशी त्यांची प्रतिमा होतीच पण, आर्थिक सुधारणा आणि नवी कररचना यामध्ये त्यांनी जी सरकारच्या वतीने क्रांतिकारी पावले उचलली त्यामुळे त्यांची अर्थमंत्री म्हणून केलेली कामगिरी अविस्मरणीय झाली. भारतीय अर्थव्यवस्थेत जोरदार मंदी येणार, आली असे सध्या वातावरण आहे. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपासून छोटे-मोठे अर्थतज्ञ शेअर मार्केटचा इंडेक्स बघून मत व्यक्त करत आहेत. पार्ले सारख्या कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे आणि बेरोजगारी बळावते आहे हे जरी खरे असले तरी इन्फोसिसचे नारायण मूर्ती भारतीय अर्थव्यवस्थेचा गौरव करताना दिसत आहेत. गेल्या 300 वर्षातील सर्वोत्तम आर्थिक स्थिती भारतीय अर्थव्यवस्थेने प्राप्त केली आहे, असे मूर्ती यांनी म्हटले आहे. कदाचित त्या संदर्भाने मतभेद असू शकतील पण शेजारी पाकिस्तान जो आपल्या बरोबरच स्वतंत्र झाला तो कटोरा घेऊन जगभर हिंडत असताना आणि त्यांच्या चलनाचे प्रचंड अवमूल्यन झाले असताना जागतिक मंदीतही भारतीय अर्थव्यवस्था जी टिकून आहे. त्यामागे अरुण जेटली यांनी व मोदी सरकारने घेतलेले, नोटाबंदी, जीएसटी असे मूलभूत निर्णय आहेत हे लक्षात घ्यावे लागेल. अरुण जेटली यांचा आणि तरुण भारत परिवाराचा वेगळा जिव्हाळा आहे. तरुण भारतने गोव्यात आपला अद्ययावत छपाई विभाग सुरू केला. त्याच्या उद्घाटनाला तत्कालीन माहिती व प्रसारण मंत्री अरुण जेटली प्रमुख पाहुणे हेते. तरुण भारत व लोकमान्य परिवाराचे मार्गदर्शन किरण ठाकुर यांच्याशी त्यांचा जिव्हाळा होता. तरुण भारतचे काम बघून ते खूपच प्रभावित झाले हे दैनिक गोव्याचे नंबर वन डेली होईल असा होरा त्यांनी बोलून दाखवला आणि घडलेही तसेच, त्यामुळे या नेत्यांच्या निधनाने तरुण भारत परिवाराला मोठे दु:ख आहेच पण कोणतीही परंपरा, जात, गॉडफादर नसताना ज्ञान, सेवाभाव आणि लोकसेवा या जोरावर पक्षनिष्ठा बाळगून राजकारणात यशस्वी होता येते याचे मूर्तीमंत उदाहरण या निधनाने काळाआड गेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले जवळचे, जिव्हाळय़ाचे मित्र व मार्गदर्शक हरपले अशा शब्दात श्रद्धांजली वाहिली. मोदी विदेश दौऱयावर आहेत. तेथून ते जेटलीच्या कुटुंबीयांशी बोलले तेव्हा जेटली कुटुंबीयांनी दौरा अर्धवट टाकून परत येऊ नका. देशासाठी तुमचा दौरा महत्त्वाचा आहे असे सांगून आपल्या संस्काराची प्रचिती दिली. बडे बाप के बडे बेटे. सत्तेचे, संपत्तीचे वारस होतात पण सेवेचा आणि संस्काराचा वारसा महत्त्वाचा असतो. जेटली यांनी तो जपला आणि रुजवला असे म्हटले तर वावगे नाही. गेले काही दिवस ते आजारी होते पण पक्षासाठी काम करत होते. भाजपा पुन्हा सत्तेवर आला तेव्हा त्यांना न मागता मंत्रीपद मिळाले असते पण प्रकृती साथ देत नाही असे सांगून त्यांनी मंत्रीपद नको असे पक्षाला सांगितले. भाजपाचा अर्थसंकल्प मांडताना वर्षामागे त्यांना सभागृहात थोडा त्रास झाला होता. पण अरुणजी जसे स्वयंप्रकाशित नेते हेते तसे स्नेहाला पक्के अशी त्यांची ख्याती होती. सर्व पक्षात त्यांना मित्र होते मंत्रिमंडळात त्यांनी माहिती, प्रसारण, संरक्षण, निर्गुंतवणूक, जहाजबांधणी, विधी-न्याय कंपनी व्यवहार अशी अनेक खाती सांभाळली. आपल्या कामाची मुद्रा उमटवली. पण, त्यांची अर्थमंत्री म्हणून बजावलेली कामगिरी असाधारण होती. त्यांनी नोटबंदी राबविली. जीएसटी लागू केला पण महागाई नियंत्रण व वित्तीय तूट कमी राखण्यात जे कौशल्य दाखवले त्याच जोडीला आर्थिक सुधारणा आणि खुलेकरण यशस्वी केले. दिवाळखोरीतल्या कंपन्या त्यांची वसुली त्यासाठीचे कायदे जेटली यांनी करून घेतले हे लक्षात घेतले पाहिजे. राजकारणी, वक्ते, विचारवंत याच बरोबर अर्थतज्ञ आणि आर्थिक सुधारणा करणारे क्रीयावान पंडित म्हणूनही त्यांची ओळख कायम राहिल. राजकारणातील स्वयं प्रकाशित नेता आणि निष्ठेने, विचाराने लोककल्याणाचे कार्य साधणारा भारत मातेचा सुपुत्र काळाआड गेला याचे दु:ख सर्वांना आहे. पक्षात आणि देशात ती उणीव जाणवणार आहे. मोठी हानी झाली आहे. जेटलींसारखा पक्षनिष्ठ लोकनेता पुन्हा उभा करणे सोपे नाही. अरुण जेटलींना भावपूर्ण आदरांजली!

Related posts: