|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » दापोलीत पकडला लाखोंचा ऑस्ट्रेलियन सागाचा साठा

दापोलीत पकडला लाखोंचा ऑस्ट्रेलियन सागाचा साठा 

कुडावळे येथील जंगलात ठेवला होता लपवून

वार्ताहर/ मौजेदापोली

दापोली तालुक्यातील कुडावळेमधील जंगलात लपून ठेवलेला ऑस्ट्रेलियन सागाचा लाखो रुपये किंमतीचा साठा रविवारी सकाळच्या सुमारास वनविभागाने पकडला आहे. मात्र हा साठा कोणी केला, झाडांची तोड कोणी केली, याची सखोल चौकशी करण्यात येणार असून संबंधितांवर लवकरच गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती वनविभागाचे वनरक्षक एस. बी. वडर यांनी दिली.

 दापोली तालुक्यात रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आलेले ऑस्ट्रेलियन साग तोडणाऱया टोळ्य़ा सक्रिय झाल्याची माहिती एका माहितगाराला काही दिवसांपूर्वी प्राप्त झाली होती. त्यानुसार त्याने खेर्डी ते कादिवली व वेळवी ते विरसई तसेच वेळवी ते बांधतिवरे आदी मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा असणाऱया ऑस्ट्रेलियन सागाची मोठय़ा प्रमाणात तोड झाल्याची खात्रीलायक बातमी वनविभागाला दिली. मात्र हा तोड केलेला ऑस्ट्रेलियन सागाचा साठा कोठे लपवून ठेवण्यात आला, याची माहिती मिळत नव्हती. यासाठी गेले आठवडाभर तालुक्यातील भानघर, तांबडीकोंड व कुडावळे येथील जंगल त्या माहितगाराने पिंजून काढले. तेव्हा हा साठा शोधून काढण्यात आला. रंगपंचमीच्या दिवशी हा साठा कुडावळे येथील नदीलगत असणाऱया एका खासगी जागेत लपवून ठेवल्याची माहिती माहितगाराला मिळाली. त्यानंतर त्याने रात्री जाऊन हा साठा कुठे आहे, याची पाहणी केली. यानंतर वनविभागाचे वनरक्षक एस. बी. वडर यांना सोबत घेऊन रातोरात या साठय़ाला सील केले.

  यानंतर वडर यांनी तत्काळ त्यांच्या वरिष्ठांशी संपर्क साधून अधिक कुमक मागवून दुसऱया दिवशी सकाळी त्या माहितगारासह पुन्हा घटनास्थळ गाठले. येथे असलेल्या ऑस्ट्रेलियन सागाच्या साठय़ाची मोजणी केली असता ते तब्बल 153 नग असल्याचे निदर्शनास आले. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात असणारा साठा पाहून वनविभागाचे अधिकारीही चक्रावले. या सर्व साठय़ाची वनरक्षक वडर त्यांचे सहाय्यक शरद शिगवण, वनपाल गणेश खेडेकर यांनी परिक्षेत्र वनाधिकारी बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोजदाद केली. सध्या हा संपूर्ण साठा सील करण्यात आला असून हे सर्व ओंडके दापोली वनाधिकारी कार्यालयात आणण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. वनविभागाने केलेल्या या कारवाईमुळे मात्र अवैधरित्या ऑस्ट्रेलियन साग तोडणाऱया टोळ्य़ांचे धाबे दणाणले आहेत.

 

Related posts: