|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोवा बागायतदारवर सावईकर पॅनलची सरशी

गोवा बागायतदारवर सावईकर पॅनलची सरशी 

प्रतिनिधी/ फोंडा

सहकार क्षेत्रातील अग्रगण्य अशा गोवा बागायतदार खरेदी विक्री संस्थेच्या संचालक मंडळासाठी झालेल्या निवडणुकीत संस्थेचे विद्यमान अध्यक्ष तथा माजी खासदार ऍड. नरेंद्र सावईकर गटाने बाजी मारली आहे. फोंडा तालुक्यातील त्यांच्या पॅनलमधील सर्व आठही उमेदवार विजयी झाले आहेत. गोव्यातील पाच तालुक्यामधून 19 जागांसाठी ही निवडणूक घेण्यात आली.

रविवार 25 ऑगस्ट रोजी मतदान प्रक्रिया पार पडली तर काल सोमवारी कुर्टी-फोंडा येथील सहकार भवनमध्ये मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला.  फोंडा तालुक्यातून ऍड. नरेंद्र केशव सावईकर, पंढरीनाथ श्रीपाद चाफडकर, हेमंत दुर्गाराम कथने, सदानंद पद्माकर सावईकर, हेमंत प्रभाकर सामंत, महेश साजू शिलकर हे खुल्या गटातून तर इतर मागासवर्गीय गटातून सुरेश शाबा केरकर व महिला गटातून उज्ज्वला सुभाष शिलकर हे उमेदवार विजयी झाले आहेत.

सांगे तालुक्यातून रमेश घनश्याम प्रभू दाभोलकर, जितेंद्र आनंद पाटील व सुवर्णा सुबोध प्रभू तेंडुलकर, काणकोण तालुक्यातून कमलाक्ष टेंगसे, डिचोली तालुक्यातून शरद महादेव सावईकर, देविदास अनंत जांभळे, विनायक नामदेव सामंत, सत्तरी तालुक्यातून अशोक यज्ञेश्वर जोशी, संतोष विश्वनाथ केळकर, सुदिन सदाशिव मराठे हे विजयी झाले.

उत्तर गोवा महिला राखीव गटातून सुरेखा दत्ताराम बर्वे यांची निवड झाली. एकूण 9600 मतदारांपैकी साधारण 46 टक्के मतदारांनी मतदान पेले. मुख्य निर्वाचन अधिकारी म्हणून देवदत्त नाईक यांनी काम पाहिले.

संस्थेची वार्षिक उलाढाल रु. 405 कोटी

गोवा बागायतदार ही गोव्याच्या सहकार क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असून या संस्थेने 55 वर्षे पूर्ण केली आहेत. कृषी बागायती क्षेत्रातील खरेदी विक्री व्यवहाराबरोबरच गोव्यातील विविध भागांमध्ये 15 स्वयंसेवा केंद्रे, मार्केट यार्ड, किराणा विभाग तसेच खत, कपडा व इतर खरेदी विक्री केंद्रे मिळून 30 शाखा आहेत. संस्थेची गेल्या वर्षीची उलाढाल साधारण रु. 405 कोटी तर रु. 3 कोटी 97 लाख नफा मिळाला आहे. एकूण सभासद 9 हजारहून अधिक तर कायम स्वरुपी, हंगामी व कंत्राटी मिळून 800 हून अधिक कर्मचारी या संस्थेमध्ये कार्यरत आहेत. 

गोवा बागायतदार ही सभासद, ग्राहक व संचालक मंडळाच्या विश्वासावर चालणारी संस्था आहे. सध्याची निवडणूक ही लोकशाही तत्त्वावर झाली असून संस्थेमध्ये ही लोकशाही व विश्वासाहर्ता कायम टिकवून ठेवण्याचा नूतन संचालक मंडळाचा प्रयत्न राहील असे ऍड. नरेंद्र सावईकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Related posts: