|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » मोदींची स्तुती थरूर यांना भोवली

मोदींची स्तुती थरूर यांना भोवली 

काँग्रेसने मागितला खुलासा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 

पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती करणे काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांना महागात पडले आहे. केरळ काँग्रेसने याप्रकरणी थरूर यांच्याकडून खुलाशाची मागणी केली आहे. माझ्या मताशी सहमत नसाल तरीही माझ्या मताचा आदर करा अशा शब्दांत थरूर यांनी काँग्रेस नेत्यांना कानपिचक्या दिल्या आहेत.

नरेंद्र मोदींचा मी कठोर टीकाकार राहिलो असून हे काम मी रचनात्मक पद्धतीने केले आहे. सर्वसमावेशक मूल्य आणि संवैधानिक सिद्धांतामुळेच मी सलग तीनवेळा निवडून आलो आहे. याचमुळे माझ्या मतांशी सहमत नसाल तरीही काँग्रेसमधील माझ्या सहकाऱयांनी माझ्या विचारांचा आदर करावा असे थरूर यांनी ट्विट करत म्हटले आहे.

माझे सहकारी आणि माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘खलनायका’प्रमाणे सादर करणे चुकीचे असल्याची भूमिका मांडली आहे. ज्येष्ठ वकील आणि काँगेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनीही जयराम यांच्या भूमिकेशी सहमती दर्शविली होती. पंतप्रधान मोदीनी एखादे चांगले काम केल्यास त्याचे कौतुक केले जावे असे मागील 6 वर्षांपासून सांगत आल्याचे थरूर यांनी नमूद केले आहे.

केरळ काँग्रेस नेतृत्वाने थरूर यांच्या विरोधात पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. केरळ काँग्रेस अध्यक्ष मुल्लाप्पल्ली रामचंद्रन आणि राज्यातील विरोधी पक्षनेते रमेश चेन्नितला यांनी थरूर यांच्या विधानाला उघड विरोध दर्शविला आहे. थरूर यांच्या खुलाशानंतर पुढील कारवाई करू असे रामचंद्रन यांनी सांगितले आहे. काँग्रेस नेत्यांनी मोदींची प्रशंसा करू नये. काँग्रेस संघपरिवाराचे धोरण स्वीकारू शकत नाही. कुठल्याच काँग्रेस नेत्याने मोदींच्या विरोधातील मोहिमेबद्दल दुःखी होऊ नये असे विधान यूडीएफचे समन्वयक बेनी बेहनन यांनी केले आहे.

Related posts: