|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पूरग्रस्तांसाठी विशेष अधिवेशन बोलवा

पूरग्रस्तांसाठी विशेष अधिवेशन बोलवा 

वार्ताहर / जमखंडी

उत्तर कर्नाटकात महापुराने मोठे नुकसान झाले असून पूरग्रस्ताकरिता विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली. जमखंडी तालुक्मयातील तुबची, शुरपाली, टक्कळकी आदी पूरपिडीत भागाचा दौरा करून पूरग्रस्तांच्या रात्री उशिरा झालेल्या सभेत ते बोलत होते.

पूरग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या असून याबद्दल मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्याशी चर्चा करून प्रत्येकाला योग्य नुकसानभरपाई देण्याचे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

जमखंडी तालुक्मयातील कुंभारहाळ, सनाळ, हिरेपडसलगी ही गावे बुडितग्रस्त असून यांचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव अधिवेशनात मांडणार आहे. ऊस पिकाच्या नुकसानीला एकरी 1 लाख व पुरात मृत झालेल्या जनावरांना 60 हजार रुपये भरपाई द्यावी. पूरग्रस्तांच्या पाठीशी आपण असून त्यांनी कोणतेही भय बाळगू नये. त्यांच्या सर्व समस्या सरकारपुढे मांडून सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे सांगून पूरग्रस्तांना सिद्धरामय्या यांनी धीर दिला.

याप्रसंगी आमदार आनंद न्यामगौड, विधान परिषद सदस्य एस. आर. पाटील, माजी मंत्री आर. बी. तिम्मापूर, उमाश्री, जिल्हा पंचायत अध्यक्षा बायक्का मेटी, एन. एस. देवरवर, वर्धमान न्यामगौड, अभयकुमार नांदेकर, अन्वर मोमिन, ईश्वर करबसन्नवर आदी उपस्थित होते.

केंद्राकडून कर्नाटकावर अन्याय

बेळगाव : केंद्र सरकाराने कर्नाटकातील पूरपरिस्थितीचे गांभीर्य जाणून घेतलेले नाही. त्यामुळे आवश्यक मदत देण्यासही दिरंगाई होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकावर अन्याय केला आहे. केंदाकडून राज्यसरकारला सापत्न भावाची वागणूक दिली जात आहे. राज्यातील गंभीर पूरपरिस्थितीकडे पाहण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमीप्रमाणे आपल्या परदेश दौऱयांमध्ये गुंतले आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पूरग्रस्त जिल्हय़ांना भेटी देऊन जनतेची दिशाभूल केली करत असल्याचा आरोप सिद्धरामय्या यांनी केला. बेळगाव जिल्हय़ातील पूरपरिस्थितीची माहिती घेण्यासाठी बेळगाव दौऱयावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

कारदगा, बारवाड, मांगूर गावास भेट

कारदगा : कारदगासह दूधगंगा नदीकाठावरील सर्वच गावामध्ये महापुरामुळे आलेल्या आपत्तीमुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्व पूरग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळावी म्हणून शासनापुढे आग्रह धरणार आहे. मी तसेच काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी राहून तुम्हाला जास्तीत जास्त मदत मिळावी म्हणून प्रयत्न करणार आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले.

कारदगा, बारवाड, मांगूर आदी पूरग्रस्त गावांना भेट देऊन पूरग्रस्तांची विचारपूस केली. ते म्हणाले, आज निपाणी व चिकोडी तालुक्यातील दूधगंगा, वेदगंगा, कृष्णा नदीकाठावरील बरीच गावे महापुराच्या पाण्याने उद्ध्वस्त झाली आहेत. पूरग्रस्तांनी हतबल न होता धीराने या संकटांना सामोरे जावे, असे सांगितले. ग्रा. पं. सदस्य राजू खिचडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी पूरग्रस्तांच्या समस्यांचे निवेदन ग्रा. पं. अध्यक्षा नंदीनी हेगडे, माजी उपाध्यक्ष भरत भागाजे व ग्रा. पं. सदस्यांच्या हस्ते सिद्धरामय्यांना देण्यात आले.

यावेळी प्रसंगसागर महाराज, आमदार गणेश हुक्केरी, चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, जि. पं. सदस्य राजू वड्डर, बेडकिहाळ ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रदीप जाधव, जवाहरचे संचालक बाबासो नोरजे, एपीएमसी सदस्य अरविंद खराडे, कुबेर आळते यांच्यासह कार्यकर्ते, पूरग्रस्त व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related posts: