|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » एमआयडीसीसाठी शंभर टक्के विरोधच!

एमआयडीसीसाठी शंभर टक्के विरोधच! 

प्रशासनाच्या दडपशाहीविरोधात कोकण रक्षक पर्यावरण समितीचा निर्धार

प्रतिनिधी/ रत्नागिरी

तालुक्यातील जयगड पंचक्रोशीमधील वाटद येथे प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्प प्रकल्पाविरोधात येथील कोकण पर्यावरण रक्षक समितीने आक्रमक पवित्रा घतला आहे. या परिसरात सुमारे 700 हेक्टर क्षेत्रावर प्रस्तावित एमआयडीसीसाठी प्रशासनाने तेथील जागा व घरमालकांना नोटीस काढल्याने प्रशासनाची दडपशाही खपवून घेणार नाही. येथे केमिकल प्रकल्प येणार असतील तर अशा एमआयडीसीला 100 टक्के विरोधच राहणार असल्याचे कोकण पर्यावरण रक्षक समितीकडून ठणकावून सांगण्यात आले.

   जयगड पंचक्रोशीतील वाटद येथे शासनाकडून औद्योगिक क्षेत्र काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले आहे. मात्र याविषयी येथील ग्रामपंचायती, सदस्य आणि ग्रामस्थांना कोणतीही कल्पना देण्यात आलेली नाही. या प्रस्तावित एमआयडीसीसाठी स्थानिकांना प्रशासनाने अंधारात ठेवले आहे. वाटद एमआयडीसी प्रकल्पात नेमक्या कोणत्या प्रकारचे उद्योग येणार, प्रकल्पांची रचना या बाबतही अंधारात ठेवण्यात आले आहे. त्या परिसरातील जमीन व घरमालकांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने नोटीसही नुकत्याच काढण्यात आल्याचे कोकण पर्यावरण रक्षक समितीचे अध्यक्ष डॉ. विकी सावंत यांनी सांगितले.

 सुमारे 3 हजार ग्रामस्थांना नोटीस प्रशासनाकडून बजावण्यात आली आहे. एक प्रकारे प्रशासनाने दडपशाही अवलंबून भूसंपादन कायद्याचेच उल्लंघन केल्याचा आरोप या समितीच्यावतीने करण्यात आला. वाटद, मिरवणे, कळझोंडी, कोळीसरे, गडनरळ व वैद्यलावगण या पाच गावांममधील 700 हेक्टर क्षेत्र त्यासाठी प्रस्तावित केल्याचे सांगण्यात आले. या गावांमध्ये प्रामुख्याने आंबा, काजू व शेती व्यवसायावर आपली उपजीविका करत आहे. अलिकडे येथील शेतकरी, आंबा बागायतदारांनी सेंद्रीय शेतीचा मोठय़ा प्रमाणात अवलंब केला आहे. त्याला कृषी विभागस्तरावर प्रोत्साहन दिले जात आहे. त्यातून या भागात चांगला रोजगारही उपलब्ध होऊ लागला आहे. या भागाचा विकास करायचाच असेल तर पंचक्रोशीत पाणी आणि वैद्यकीय सुविधा निर्माण व्हाव्यात. फळबाग आणि मत्स्य प्रक्रियेवर आधारित प्रकल्प आणावेत. त्याचप्रमाणे ऍग्रो पर्यटन क्षेत्राच्या विकासाला चालना देण्याची येथील सर्व जनतेची मागणी आहे. अशावेळी जर येथे प्रदुषणकारी प्रकल्पांची उभारणी झाली तर येथील गाव प्रदुषणाच्या विळख्यात सापडण्याची दाट शक्यता समितीकडून व्यक्त करण्यात आली आहे.

  कोकण पर्यावरण रक्षक समितीने पुढाकार घेत प्रशासनाची धाकदटपशाही मोडून काढण्याचा निर्धार केला आहे. येथे पर्यावरणपूरक उद्योग यावेत, अशी मागणी आहे. या समितीच्या माध्यमातून येथील प्रांताधिकारी अमित शेडगे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. या ठिकाणी केमिकल एमआयडीसी प्रकल्प आणू नयेत, अशी मागणीही समितीतर्फे करण्यात आली. या निर्माण झालेल्या प्रश्नाबाबत कोकण पर्यावरण रक्षक समितीची बैठक शनिवारी पार पडली. बैठकीला अध्यक्ष डॉ. विकी सावंत, उपाध्यक्ष व माजी सरपंच अनिकेत सुर्वे, उमेश रहाटे, विद्यमान सरपंच व खजिनदार प्रशांत घोसाळे, समीर आढाव, उपसरपंच लक्ष्मी पांचाळ, अशोक पांचाळ, योगेंद्र कल्याणकर यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेऊन पर्यावरणपूरक प्रकल्प उभारणीसाठी निवेदन देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.  

बंद प्रकल्पांना ऊर्जितावस्था द्या!

शासनाला जर औद्योगिकरणाद्वारे प्रगती साधावयाची असेल तर जिल्हय़ातील मिरजोळे, झाडगाव, उद्यमनगर, खेड, चिपळूण एमआयडीसीतील बंद पडलेल्या कारखान्यांना ऊर्जितावस्था देण्याची उपाययोजना करा. त्यासाठी नव्याने एमआयडीसी निर्माण करण्याची कोणतीही आवश्यकता नसल्याचे कोकण रक्षक पर्यावरण समितीने सांगितले.

Related posts: