|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » मनोज नरवणे सैन्य उपप्रमुखपदी

मनोज नरवणे सैन्य उपप्रमुखपदी 

जनरल देवराज अंबू यांची घेतली जागा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 

 लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी रविवारी भारतीय सैन्य उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे. मनोज नरवणे हे आता लेफ्टनंट जनरल डी. अंबू यांची जागा घेणार आहेत. सैन्यप्रमुख बिपिन रावत हे 31 डिसेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर नरवणे हे सैन्यप्रमुखपदाच्या शर्यतीत दिसून येणार आहेत.

मराठमोळे असलेले नरवणे हे मुळचे पुण्याचे आहेत. त्यांचे शालेय आणि प्रारंभीचे सैन्य शिक्षण पुण्यातच पार पडले आहे. महाविद्यालयीन शिक्षणानंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण पूर्ण करून ते 1980 मध्ये सैन्यात दाखल झाले. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांचा बीमोड करण्यासाठी कार्यरत राष्ट्रीय रायफल्सचे त्यांनी नेतृत्व केले आहे. आसाम रायफलच्या उत्तरपूर्व विभागाचे ‘इन्स्पेक्टर जनरल’, स्ट्राइक कोअरचे दिल्ली क्षेत्रातील ‘जनरल ऑफिसर इन कमांडिंग’, सैन्य प्रशिक्षण विभागाचे प्रमुख, महू येथील सैन्य युद्धशास्त्र महाविद्यालयात प्रशिक्षक अशा आजवर अनेक पदांची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे.

युद्ध, शांतताकालीन आणि दहशतवादाने धुमसणाऱया अशा तिन्ही प्रकारच्या क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केले आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांनी स्वतःचे कौशल्य, वेगळेपण सिद्ध केले आहे. त्यांच्या कामगिरीची वेळोवेळी दखल घेण्यात आली आहे. परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पद, सैन्यपदक, विशिष्ट सैन्यपदकाने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. श्रीलंकेतील ऑपरेशन पवनदरम्यान ते भारतीय शांतता सैन्यात कार्यरत होते.

Related posts: