|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » आंतरराज्य पिस्तूल तस्कर जेरबंद

आंतरराज्य पिस्तूल तस्कर जेरबंद 

तीन पिस्तूल, पाच काडतुसे जप्त : स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई

प्रतिनिधी/ सांगली

मध्यप्रदेशमधून सांगलीत पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या आंतरराज्य तस्करास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. नविन रावसाहेब गायकवाड (वय 37 रा. माधवगंज, उटारखाना, ग्वाल्हेर, मध्यप्रदेश) असे या तस्कराचे नाव आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे तीन पिस्तूल व पाच जीवंत काडतुसे असा दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत त्याच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती मनिषा डुबुले यांनी अवैधरित्या शस्त्र तस्करी, बाळगणाऱयांच्यावर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेला दिल आहेत. त्यानुसार पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी यासाठी खास पथके तयार केली आहेत. यातील एक पथक सांगली शहरात गस्तीवर असताना पिस्तूल विक्रीसाठी एक व्यक्ती सांगलीत येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने सिव्हिल हॉस्पिटल ते सांगली स्टॅंडरोडवर सापळा लावला. या सापळ्यात गायकवाड अलगद सापडला. सम्राट व्यायाम मंडळाजवळ त्याला जेरबंद करण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता, तीन पिस्तूल व पाच जीवंत काडतुसे असा दीड लाख रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.

पथकातील कर्मचाऱयांनी पिस्तूल व जीवंत काडतुसे जप्त केली. सांगलीत ही पिस्तूल विक्रीसाठी आल्याची कबूली गायकवाडने दिली आहे. त्यानुसार त्याच्यावर सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गायकवाड याच्यावर यापूर्वीही बेकायदा शस्त्रे बाळगल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यावेळी एका गावठी कट्टय़ासह एक पिस्टल व पाच जीवंत काडतुसे त्याच्याकडून जप्त करण्यात आली होती. याशिवाय गायकवाड हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्या महाराष्ट्र व मध्यप्रदेश मध्ये बेकायदा शस्त्र विक्री, जीवघेणा हल्ला यासारख्या गंभीर गुह्यांची नोंद आहे. पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बिरोबा नरळे यांच्यासह पथकातील कर्मचाऱयांनी ही कारवाई केली.

 

 

 

 

Related posts: