|Sunday, March 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » कृष्णा नदीत उडी घेऊन महिलेची आत्महत्या

कृष्णा नदीत उडी घेऊन महिलेची आत्महत्या 

कराड

कराड-विटा रोडवरील नव्या कृष्णा पुलावरून उडी घेत महिलेने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी 11 वाजता घडली.

सुनंदा प्रकाश माने (वय 49, रा. करवडी, ता. कराड, सध्या रा. मुंबई) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेनंतर पुलावर बघ्यांची गर्दी जमून वाहतूक ठप्प झाली होती. आत्महत्येचे कारण उशिरापर्यंत समजू शकले नव्हते. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास कृष्णा पुलावर दुहेरी वाहतूक सुरू होती. यावेळी एक महिला चालत पुलावर आली. पुलाच्या मध्यभागी आल्यावर महिलेने संरक्षक कठडय़ावरून नदीपात्रात उडी घेतली. पुलावरून जाणाऱया वाहनधारकांनी आरडाओरडा केला. ही माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, तर काही युवकांनी महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु यश आले नाही.

दरम्यान, महिलेने पुलावरून नदीत उडी घेतल्याचे समजताच पुलावर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याने पोलिसांची धावपळ उडाली. वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या. सुमारे तासाभराच्या प्रयत्नानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

दरम्यान, आत्महत्या केलेल्या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात आणला होता. याची माहिती मिळताच नातेवाईक रुग्णालयात दाखल झाले. घटनेची नोंद शहर पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

Related posts: