|Monday, December 16, 2019
You are here: Home » Top News » कोयना धरणाचे दरवाजे 8 फुटांपर्यंत उचलले

कोयना धरणाचे दरवाजे 8 फुटांपर्यंत उचलले 

ऑनलाइन टीम / पाटण : 

काल रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे कोयना धरणातील पाणीसाठा 104.92 टीएमसीपर्यंत पोहचला आहे. त्यामुळेच धरणातील पाणी साठवण क्षमता संपुष्टात आली आहे. त्यातच रात्रीपासून महाबळेश्वर, नवजा, कोयना या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे कोयना धरणाचे दरवाजे 8 फुटांपर्यंत उचलण्यात आले आहेत. पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणाचे दरवाजे आणखी काही फुटांनी उचलण्यात येण्याची शक्यता आहे.

कोयना धरण क्षेत्रात होत असलेल्या जोरदार पावसामुळे धरणात प्रतिसेकंद 86 हजार 553 क्युसेक पाण्याची आवक होऊ लागली आहे. त्यामुळे धरणाचे दरवाजे 8 फुटांपर्यंत उचलण्यात आले आहेत. सध्या धरणातून प्रतिसेकंद 73 हजार 63 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीत केला जात आहे. जर वाढलेला पावसाचा जोर कायम राहिल्यास दरवाजे आणखी उचलावे लागणार असल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे.

कोयना धरणाची पाणीसाठवण क्षमता 105 टीएमसी इतकी आहे. त्यामुळेच पावसाचा जोर वाढल्याने धरणाचे सहा वक्री दरवाजे बुधवारी सकाळी धरणाचे दरवाजे दोन फुटांवरून तीन फुटांपर्यंत नेण्यात आले होते. मात्र धरणात होणाऱया पाण्याची आवक लक्षात घेत हेच दरवाजे चार, नंतर सहा आणि त्यानंतर आठ फुटापर्यंत उचलण्यात आले आहेत. त्यामुळे कोयनेसह कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असून नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

 

Related posts: