|Friday, January 24, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » रशियाला 72 हजार कोटींचे कर्ज

रशियाला 72 हजार कोटींचे कर्ज 

पंतप्रधान मोदींची घोषणा : ईस्टर्न परिषदेला उपस्थिती : पहिल्यांदाच एखाद्या देशाच्या विशिष्ट क्षेत्राला मदत

वृत्तसंस्था/ व्लादिवोस्तोक

रशियाच्या व्लादिवोस्तोक शहरात आयोजित ईस्टर्न इकॉनॉमिक फोरममध्ये (ईईएफ) पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले आहेत. दुर्गम पूर्व क्षेत्राच्या विकासासाठी भारत 1 अब्ज डॉलर्सची (सुमारे 72 हजार कोटी रुपये) देणार असल्याची घोषणा मोदींनी फोरममध्ये बोलताना गुरुवारी केली आहे. भारताचे ऍक्ट ईस्ट धोरण आर्थिक कूटनीतिचे नवे पैलू प्रस्थापित करणार असल्याचे मोदी म्हणाले. तत्पूर्वी मोदींनी जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांची भेट घेत चर्चा केली आहे. मागील दोन महिन्यात मोदी दोनवेळा अबे यांना (28-29 जून, जी-20 परिषद आणि 26 ऑगस्ट, जी-7 परिषद बियारित्झ, फ्रान्स) भेटले आहेत.

महत्त्वाच्या क्षणाला महत्त्वपूर्ण ठरविण्यासाठी पुतीन यांच्या निमंत्रणांचा मी आभारी आहे. त्यांनी हे निमंत्रण लोकसभा निवडणुकीपूर्वीच दिले होते. आजचे आमचे मंथन मानवकल्याणाच्या प्रयत्नांना नवा वेग देणार असल्याचा मला पूर्ण विश्वास आहे. रशियाचा सुमारे तीन चतुर्थांश भूभाग आशियात मोडतो. या क्षेत्राचा आकार भारतापेक्षा सुमारे दुप्पटीने अधिक असून तेथील लोकसंख्या केवळ 60 लाख आहे. पण हे क्षेत्र खजिन, तेल-वायू यासारख्या नैसर्गिक साधनसंपदेने युक्त आहे. येथील  लोकांनी स्वतःचे साहस आणि नवोन्मेषाद्वारे निसर्गाच्या आव्हानांवर मात केली आहे. तसेच क्रीडा, उद्योग, कला-संस्कृतीच्या क्षेत्रात व्लादिवोस्तोकच्या लोकांनी ठसा उमटविल्याचे मोदी म्हणाले.

भारत-अतिपूर्वेचे नाते जुने

पुतीन यांच्यासोबत स्ट्रीट ऑफ द फार ईस्ट एनुएशन पाहिले असून येथील लोकांचे वैविध्य आणि तांत्रिक विकासाने अत्यंत प्रभावित केले आहे. भारत आणि अतिपूर्वेचे नाते खूप जुने आहे. व्लादिवोस्तोकमध्ये स्वतःचा दूतावास सुरू करणारा भारत पहिला देश आहे. अन्य विदेशी नागरिकांवर येथे प्रवेश करण्यास बंदी असताना व्लादिवोस्तोक भारतीयांसाठी खुले होते. या भागीदारीचा वृक्ष स्वतःची मूळे अधिक खोलवर नेत आहे. भारताने येथील ऊर्जा आणि हिऱयांच्या खाणक्षेत्रात महत्त्वाची गुंतवणूक केल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.

जपानशी अनेक मुद्यांवर चर्चा

मोदी आणि अबे यांच्यादरम्यान आर्थिक, सुरक्षा, स्टार्टअप आणि 5 जी यासारख्या मुद्दय़ांवर चर्चा केल्याची माहिती विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी दिली आहे. दोन्ही नेत्यांनी क्षेत्रीय स्थितीवरही विचारांचे आदान-प्रदान केले आहे. जपान-भारत यांच्यातील वार्षिक बैठक डिसेंबर महिन्यात दिल्ली येथे आयोजित होऊ शकते. मोदींनी मलेशियाचे पंतप्रधान महातिर मोहम्मद तसेच मंगोलियाचे राष्ट्रपती खाल्तमागिन बतुल्गा यांचीही भेट घेतल्याचे विदेश सचिव विजय गोखले यांनी सांगितले आहे.

झाकिर नाईकचे प्रत्यार्पण

मोदींनी महातिर यांच्यासमोर वादग्रस्त मुस्लीम प्रचारक झाकिर नाईकच्या प्रत्यार्पणाचा मुद्दा उपस्थित केला आहे. दोन्ही देशांचे अधिकारी या मुद्यावर परस्परांच्या संपर्कात राहतील असे निश्चित करण्यात आले आहे. दोन्ही नेत्यांनी भारत-मलेशियादरम्यान पहिली 2 प्लस 2 बैठकीवर सहमती दर्शवली असून यात दोन्ही देशांचे विदेश आणि संरक्षणमंत्री चर्चा करणार आहेत.

भागीदारी वृद्धिंगत करू

पुतीन यांचा अतिपूर्वेसाठीचा ओढा भारतासारख्या सहकाऱयांसाठी महत्त्वाची संधी प्रदान करणारा ठरला आहे. त्यांनी गुंतवणुकीचे मार्ग खुले करत सामाजिक विकासावरही लक्ष दिले आहे. 2024 पर्यंत भारताला 5 अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था करण्याच्या संकल्पासह आम्ही वाटचाल करत आहोत. भारत आणि रशियाची भागीदारी वृद्धिंगत करण्याची विशेष संधी उपलब्ध नसल्याचे  मोदी म्हणाले.

 

अतिपूर्वेच्या 11 गव्हर्नरांना निमंत्रण

अतिपूर्वेच्या सर्व 11 गव्हर्नरांना भारतभेटीचे निमंत्रण देतो. भारत-रशिया संबंधांसाठी पुतीन यांच्या साथीने महत्त्वाकांक्षी लक्ष्य बाळगले आहे. भारत-प्रशांत क्षेत्रात आम्ही सहकार्याचे नवे युग सुरू करणार आहोत. चेन्नई-व्लादिस्वोस्तोकदरम्यान जहाजांची वाहतूक सुरू झाल्यावर द्विपक्षीय भागीदारी वाढणार असल्याचे मोदींनी म्हटले आहे.

Related posts: