|Sunday, January 19, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » पाक सैन्यप्रमुखांची नवी वल्गना

पाक सैन्यप्रमुखांची नवी वल्गना 

काश्मीर म्हणे पाकिस्तानची दुखरी नस : अखेरच्या गोळीपर्यंत लढण्याची केली दर्पोक्ती

वृत्तसंस्था/ रावळपिंडी 

पाकिस्तानचे सैन्यप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी काश्मीर आमची दुखरी असल्याचे म्हणत भारताविरोधात नवी वल्गना केली आहे. काश्मिरी बांधवांसाठी अखेरची गोळी तसेच सैनिकापर्यंत लढणार असल्याचे उद्गार बाजवा यांनी रावळपिंडी येथील सैन्यमुख्यालयात बोलताना शुक्रवारी काढले आहेत.

पाकिस्तानने दहशतवादाच्या मुद्यावर स्वतःची जबाबदारी पूर्णपणे पार पाडली आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने आता स्वतःचे कर्तव्य पार पाडावे. शांततापूर्ण आणि बळकट पाकिस्तानची निर्मिती हेच आमचे अंतिम लक्ष्य असून हळूहळू आम्ही त्या दिशेने वाटचाल करत आहोत. कुठलेही युद्ध आणि दहशतवादाच्या खात्म्यासाठी बलिदान देण्यास पाक सैन्य मागेपुढे पाहणार नसल्याची दर्पोक्ती बाजवा यांनी केली आहे.

दहशतवादविरोधी लढाईत पाकिस्तानी सैनिक भिंतीप्रमाणे उभे ठाकले आहेत. शत्रूचा कुठलाही कट आम्ही हाणून पाडू शकतो. देश स्वतःच्या शहिदांच्या बलिदानाला स्मरणात ठेवणार असल्याचे बाजवा यांनी म्हटले आहे. पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआयकडून दहशतवादाला चालना मिळत असल्याचे जगजाहीर झाले आहे. दहशतवादविरोधी लढाईचा पाकिस्तानचा कांगावाही आता जगाला कळून चुकला आहे.

भारतीय सैन्यावर नाहक आरोप

बाजवा यांनी यावेळी भारतीय सैन्य आणि सरकारवर आरोप केले आहेत. काश्मीर हे पाकिस्तानचे अपूर्ण राहिलेले धोरण आहे. संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचे प्रस्ताव आणि काश्मिरी लोकांच्या आकांक्षानुरुप वादावर तोडगा निघेपर्यंत हा प्रश्न कायम राहणार असल्याचे म्हणत बाजवा यांनी एकप्रकारे दहशतवाद सुरूच ठेवण्याचे संकेत दिले आहेत.

काय तर म्हणे गळय़ातील नस

पाकिस्तानचा कुठलाही महत्त्वाचा दिवस असो, भारताचे नाव न घेता तो पूर्णच होत नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीरला पाकिस्तानची ‘गळय़ातील नस’ ठरवत कलम 370 हद्दपार करण्याच्या भारताच्या निर्णयाला अनैतिक ठरविले आहे. तर पाकचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी काश्मीरच्या जनतेबद्दल पाकिस्तान समर्थन सुरूच ठेवणार असल्याचे म्हटले आहे. 2015 मध्ये तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांनीही काश्मीरला पाकिस्तानची गळय़ातील नस ठरविले होते.

चित्रपट पाहून करतोय भारतविरोधी युद्धाची तयारी

पाकिस्तानचे सरकार चित्रपट पाहून भारताच्या विरोधात स्मार्ट वॉरची तयारी करत आहे. पाक सरकारने कशाप्रकारे युद्ध लढविले जावे आणि यात भारतातील मुस्लिमांना नुकसान पोहोचू नये हे ठरविण्यासाठी चित्रपट पाहून धडा घेतला आहे. पाकिस्तान केवळ हिंदूंनाच ठार करणाऱया स्मार्ट बॉम्बचा वापर करणार असल्याचे अकलेचे तारे पाकिस्तानच्या रेल्वेमंत्र्यांनी तोडले आहेत. पाकचे रेल्वेमंत्री शेख राशिद स्वतःच्या विचित्र विधानांसाठी जगभरात चर्चेत आहेत. पाकिस्तानची अनेकदा त्यांनी जागतिक व्यासपीठांवर नाचक्की केली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्वतःच्या मूर्खतापूर्ण विधानांनी पाकची गोची केली आहे. आयएसबीआयचा चित्रपट पूर्ण पाहिला असून आमच्याकडे आण्विक बॉम्बशिवाय कुठलाच उपाय नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर पाकच्या नॅशनल प्रेस क्लबने त्यांच्यावर बंदी घातली आहे.

Related posts: