|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » प्रिन्स क्लबमध्ये रंगला पानसुपारीची सोहळा

प्रिन्स क्लबमध्ये रंगला पानसुपारीची सोहळा 

शंभराहून अधिक मंडळांची उपस्थिती, कार्यकर्त्यांनी दिल्या एकमेकांना शुभेच्छा

प्रतिनिधी/ कोल्हापूर

मंगळवार पेठेतील प्रिन्स क्लबने शंभरावर तालीम संस्था व मंडळांना मानाच्या पानसुपारीचा विडा देऊन त्यांच्याशी पूर्वीपासून असलेला ऋणानुबंध शुक्रवारी अधिक घट्ट केला. इतकेच नव्हे तर विडा दिल्यानंतर अत्यंत गरजू पुरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही मंडळांना प्रिन्स क्लबकडून करण्यात आले. मंडळांनीही गरजू पुरग्रस्तांना आर्थिक व प्रापंचिक साहित्याची मदत देण्यास आम्ही पुढाकार घेऊ असे अभिवचन क्लबच्या पदाधिकाऱयांना दिले.

   गणेशोत्सवात प्रिन्स क्लबच्या आयोजित केल्या जाणाऱया पानसुपारी कार्यक्रमांचे यंदाचे 26 वर्ष आहे. शहरातील तालीम व मंडळांना मानाचा विडा स्वीकारण्यास  येण्यासाठी आग्रहाचे निमंत्रण देण्यास क्लबच्या कार्यकर्त्यांनी गेली चार दिवस पायपीट केली होती. मंडळांनीही निमंत्रणाचा मान राखत मानाचा पानसुपारीचा विडा स्वीकारण्यासाठी क्लबस्थळी उपस्थिती दर्शविली.

  छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यांचे पुजन करुन पानसुपारी कार्यक्रमाला प्रारंभ केला. यानंतर तीन तास सुरु राहिलेल्या या मानासन्मानाच्या कार्यक्रमात शिवाजी पेठेतील सरदार तालीम, खंडोबा तालीम, वेताळ तालीम, जुना बुधवार तालीम, खासबाग मैदानजवळील बालगोपाल तालीम मंडळ, मंगळवार पेठेतील सणगर तालीम, बोडके तालीम, तुकाराम माळी तालीम, पाटाकडील तालीम, राजारामपुरी तालीम, पाण्याचा खजिनाजवळील नंगीवली तालीम, श्री छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळ, राजारामपुरीतील शिवाजी तरुण मंडळ, मिरजकर तिकटी येथील नृसिंह दोस्त मंडळ आदींसह विविध तालीम व मंडळांना क्लबकडून मानाचा पानसुपारीचा विडा देण्यात आला.  

  क्लबचे ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक पोवार यांच्यासह अध्यक्ष अभिजित पोवार, उपाध्यक्ष विशाल कोळेकर, सचिव संदीप पोवार यांनी तालीम व मंडळाच्या पदाधिकाऱयांचे आदरातिथ्य केले. तसेच पदाधिकाऱयांच्या हाती मानाचा विडा ठेवत भावी वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. यावेळी क्लबच्या उत्सव समितीचे अध्यक्ष नौमान म्हेतर, उपाध्यक्ष सागर मानानगडकर, सचिव आदित्य चौगले, खजिनदार निखिल खोत आदी उपस्थित होते.

महिलांसाठी हळदी-कुंकुवाचा कार्यक्रम

प्रिन्स क्लबच्या महिला कार्यकर्त्यांकडून हळदी-कुकूंवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, जुना बुधवार पेठ, संभाजीनगर, नागाळा पार्क, साठमारी व शाहूपुरी येथील महिलांनी सहभागी होऊन एकमेकींनाना हळदी-कुंकु दिला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्लबच्या अनिता पोवार, दिपांजली पोवार, सरस्वती पोवार, ज्योती पोवार, सुप्रिया पोवार, गौरी पोवार, अंजली पोवार, नफिसा पाटील, श्रावणी गाताडे, सिद्धी काटकर, मानसी पिसाळ, वैशाली पोवार आदींनी परिश्रम घेतले.

Related posts: