|Friday, February 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » महाबळेश्वर ठरले सर्वाधिक पावसाचे शहर

महाबळेश्वर ठरले सर्वाधिक पावसाचे शहर 

चेरापुंजी, मॉसिनरामला मागे टाकत नेंदविली जागतिक कामगिरी

प्रतिनिधी/ महाबळेश्वर

जगात सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण म्हणुन यापुर्वी मेघालयातील मॉसिनराम या शहराची ओळख होती, परंतु यंदा महाबळेश्वर शहराने हा किताब पटकाविला आहे. महाबळेश्वर शहराने अगदी दिमाखात येथे त्रिशतकाला गवसणी घातली आहे.  यावर्षी येथे आजपर्यंत 7631 मिमि पाऊस झाला आहे. महाबळेश्वरने यावर्षी 300 इंच पावसाचा टप्पा पार केला आहे. 13 वर्षानंतर म्हणजेच 2006 नंतर इतक्या विक्रमी पावसाची येथे नोंद झाली असून आजही येथे मुसळधार पाऊस कोसळतच आहे.  

  सर्वाधिक पावसाची नोंद देशात चेरापुंजी येथे होत होती. मागील वर्षी चेरापुंजीला मागे टाकुन जगात सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणुन मेघालयातील मॉसिनराम शहराची नोंद झाली. गेल्या वर्षी चेरापुजी हे दोन नंबरला होते. यंदा मात्र जगात सर्वाधिक पाऊस पडण्याचे ठिकाण म्हणून मॉसिनरामला मागे टाकुन हा किताब महाबळेश्वर शहराने पटकाविला आहे. हवामान खात्याने नुकतीच याबाबतची आकडेवारी प्रसिध्द केली आहे. या आकडेवारीवरून यंदा मॉसिनराम शहराने आजपर्यंत साडे सहा हजार मिमीचा टप्पा पार केला आहे तर महाबळेश्वर शहराने साडे सात हजार मि मी चा टप्पा पार केला आहे. तब्बल तेरा वर्षांनतर 1 जुन ते आजअखेर येथे 300 इंच पावसाची विक्रमी नोंद झाली आहे. मागील वर्षी याच काळात येथे 237 इंच पावसाची नोंद येथे झाली होती. 

  कोकण, पश्चिम घाटात आणि मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर हे असे आगळंवेगळं गिरीस्थान आहे कि, याठिकाणी नेहमी सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद होते. महाबळेश्वर येथे सदाहरित घनदाट जंगल, उंच डोंगररांगा असे भौगोलिक स्थिती असून येथे पावसाळय़ात थंडी आणि दाट धुक्याची चादर पसरलेली असते. अशा वातावरणात येथे वर्षा सहलीसाठी मोठय़ा संख्येने पर्यटक येतात आणि पावसाचा आनंद लुटतात. पावसाळी पर्यटनाचे मापदंड महाबळेश्वर शहराने बदलण्यास भाग पाडले असून पावसाळय़ात सहलीसाठी येत असलेल्या पर्यटकांच्या संख्येत दरवर्षी भर पडत आहे. यंदा देशातच नव्हे तर जगात सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण म्हणुन महाबळेश्वर शहराची नोंद झाल्याने जगातील पर्यटकांना महाबळेश्वर शहराची दखल घेणे भाग पडले असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही.   

महाबळेश्वर पावसामुळे सर्व धरणे तुडुंब

महाबळेश्वर येथे पडणाऱया पावसावरच अनेक धरणे अवलंबुन आहेत. मागील महिन्यात येथे रोज 12 ते 15 इंच पाउस पडत होता. याच कालावधीत महाबळेश्वरच्या पावसावर अवलंबुन असलेली सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरली होती. धरणे भरली तरी येथे पाऊस कोसळतच होता. सर्वच धरणात अतिरिक्त पाणी साठा झाल्याने सर्वच धरणातून पाण्याचा मोठय़ा प्रमाणावर विसर्ग सुरू करण्यात आल्याने नदीकाठी असलेल्या अनेक गावांना धोक्याचा इशारा प्रशासनाने दिला होता. सांगली व कोल्हापूर जिल्हय़ात हाहाकार माजला होता. काही काळ विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुन्हा जोमाने बॅटिंग सुरू केल्याने पुन्हा सांगली व कोल्हापुरकरांना पुराचा धोका निर्माण झाल्याने तेथील नागरिकांची चिंता वाढली आहे.

पाटणमध्ये पावसाचे नॉटआऊट 110 दिवस

यावर्षी पावसाने उशीरा सुरुवात केली असली तरीही 1998 आणि 2005 पेक्षाही जास्त पाऊस पडला आहे. गतवर्षीच्या तुलनेत 12 टक्के जास्त पाऊस झाला आहे. पाटण तालुक्यात तर चक्क अजूनही नॉट आऊट 110 व्या दिवशीही पावसाची संततधार सुरु आहे. यावर्षी देशात सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण असलेले चेरापुंजीचेही रेकॉर्ड पाटण तालुक्यातील पाथरपुंजने मोडले आहे. जिह्यातील सर्वच धरणे काठोकाठ भरुन ओव्हरफ्लो होवून नदीपात्रात धरणात साठवलेल्या पाण्यापेक्षा कित्येक पटीने पाणी सोडण्यात आले आहे, अशी माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

Related posts: