|Saturday, February 22, 2020
You are here: Home » मनोरंजन » पेशव्यांच्या ‘स्वामिनी’ची कथा छोटय़ा पडद्यावर

पेशव्यांच्या ‘स्वामिनी’ची कथा छोटय़ा पडद्यावर 

  मराठी साम्राज्याचा झेंडा अटकेपार लावला तो शूर, पराक्रमी, रणधुरंधर पेशव्यांनी. रणांगणामध्ये युध्द जिंकण्याचा निश्चय, शौर्य, उत्तम रणनीती यामुळे पेशव्यांनी आपल्या पराक्रमाची शर्थ करत मराठा साम्राज्य चोहीकडे पसरवले. या सगळय़ामध्ये पेशवाईचा आधारस्तंभ ठरल्या घरातील स्त्रिया. स्त्रियांचे पेशव्यांच्या कारभारात, राजकारणात, निर्णयात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या नेहमीच सहभाग असे. महाराष्ट्राचा इतिहास साक्षी आहे, प्रत्येक यशस्वी थोर पुरुषामागे स्त्राrचा सक्रिय सहभाग राहिला आहे. पेशव्यांच्या काळात एक पतिव्रता, एकनिष्ठ स्वामिनी होऊन गेली ती म्हणजेच माधवरावांची रमा. माधव आणि रमाचे लग्न संपूर्ण पेशवाईला एक वेगळी कलाटणी देणारे ठरले. सत्ता आणि संसार, कौटुंबिक कलह, कटकारस्थाने, राजकारणी डावपेच यामध्ये रमा माधवरावांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. पेशवाईचा इतिहास आणि त्या पार्श्वभूमीवर छोटय़ा पडद्यावर रंगणारी ‘रमा माधवा’ची प्रेमकथा म्हणजे स्वामिनी. येत्या 9 सप्टेंबरपासून सोमवार ते शनिवार  रात्री 8.30 वाजता कलर्स मराठीवर ही मालिका प्रसारित होणार आहे.

  रमा एका सामान्य घरात वाढलेली हुशार, निरागस मुलगी. जिच्या नशिबी पेशवीणबाई होण्याचे थोर भाग्य आले पण या भरजरी वस्त्रांसोबत येणाऱया किंबहुना त्याहून अधिक कठीण जबाबदाऱयांपासून ती अनभिज्ञ होती. पानिपतनंतर पेशवाईला पुन्हा एकदा सुवर्ण झळाळी देण्याची जबाबदारी माधवरावांनी वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी घेतली. माधवरावांशी विवाह हा रमासाठी एक अपघात होता. एकीकडे माधवरावांचा विश्वास मिळवणे आणि दुसरीकडे अत्यंत कठोर, धोरणी गोपिकाबाई यांच्याशी जुळवून घेणे अशी आव्हाने छोटय़ा रमासमोर होती. शनिवारवाडय़ामध्ये प्रेमळ पार्वतीबाईंचा रमाला कायम आधार वाटला तर धूर्त, कावेबाज आनंदीबाई देखील शनिवारवाडय़ात होत्याच. या सगळय़ामध्ये रमा- माधवच्या सहजीवनाचा नवा प्रवास सुरू झाला. मालिकेमध्ये गोपिकाबाईंची भूमिका महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर तर रमाच्या भूमिकेत सूर नवा ध्यास नवा छोटे सूरवीर पर्वातील सफष्टी पगारे आणि माधवरावांच्या भूमिकेत नवोदित चिन्मय पटवर्धन असणार आहेत.

  मालिकेचे लेखक-दिग्दर्शक विरेन प्रधान म्हणाले, एका सामान्य मुलीचा राजकन्या बनण्यापर्यंतचा प्रवास ही गोष्ट कलर्स मराठीवर दाखविण्याची संधी मला मिळाली याचा अत्यंत आनंद होत आहे. पेशवाईचा काळ आणि त्याचे देखणे रूप या मालिकेतून प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. नवीन कलाकारांसोबत काम करायला मला नेहमीच आवडते आणि ती संधी पुन्हा एकदा ‘स्वामिनी’ या माझ्या नव्या मालिकेद्वारे मला मिळाली आहे.

Related posts: