|Saturday, February 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कार-दुचाकी अपघातात युवक गंभीर जखमी

कार-दुचाकी अपघातात युवक गंभीर जखमी 

चिपी येथील घटना : दोघे किरकोळ जखमी

प्रतिनिधी / कुडाळ:

परुळे-मालवण रस्त्यावरील विमानतळा लगतच्या चिपी-कालवंड येथे मारुती झेन व मोटारसायकल यांच्यामध्ये झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील जानू हनुमंत धुरी (रा. मेढा-निवती) हा युवक गंभीर जखमी झाला, तर अन्य दोघे युवक किरकोळ जखमी झाले.

मारुती झेन चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने त्याने मोटारसायकलला धडक दिली. कारचालक मंदार रामकृष्ण मठकर (रा. आरोंदा-जोशीवाडी) याच्या विरोधात निवती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात 5 सप्टेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता झाला होता. जानू धुरी याला अधिक उपचारासाठी बेळगाव येथील के. एल. ई. रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याबाबत भूपेश आनंद मेस्त याने निवती पोलीस ठाण्यात खबर दिली. या अपघातात भूपेश मेस्त (रा. निवती) व नागेश संभाजी वेंगुर्लेकर (रा. मालवण) हे दोघे युवक किरकोळ जखमी झाले.

पोलिसांत दिलेल्या खबरीत म्हटले आहे, आपण मोटारसायकलवरून मालवणकडे गणपती बघायला जात होतो. परुळे-चिपी विमानतळा दरम्यान कालवंडवाडी येथे गेलो असता, समोरून येणाऱया मारुती झेनने आमच्या मोटारसायकलला धडक दिली.

या अपघातात जानू धुरी हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर जखमींना पडवे येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथून बेळगाव येथे हलविण्यात आले. याप्रकरणी मारुती झेनचालक मंदार मठकर याच्या विरोधात भा. दं. वि. कलम 279, 337, 338, मोटर व्हईकल ऍक्ट 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार विश्वनाथ नाईक करीत आहेत.

Related posts: