|Saturday, February 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आंबोली घाटातून अवजड वाहतुकीला बंदी कायम!

आंबोली घाटातून अवजड वाहतुकीला बंदी कायम! 

सार्वजनिक बांधकाम अभियंत्यांची माहिती

वार्ताहर / सावंतवाडी:

आंबोली घाटमार्गावरून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. गणेश चतुर्थीच्या कालावधीत हा घाटमार्ग एसटीसह अन्य छोटय़ा वाहनांसाठी 24 तास खुला करण्यात आला होता. मात्र, अवजड वाहनांसाठी हा घाट पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. पाऊस संपल्यानंतर घाटरस्ता खचलेल्या भागाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता युवराज देसाई यांनी दिली.

जिल्हय़ातून पश्चिम घाटमाथ्यावर जाण्यासाठी चार घाटमार्ग कार्यरत आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाच्या असलेल्या आंबोली घाटमार्गावर असणाऱया मुख्य धबधब्यासमोरील रस्त्याचा अर्धा भाग अतिवृष्टीच्या काळात खचला होता. त्यामुळे 15 दिवस या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. सतत कोसळणाऱया पावसामुळे खचलेल्या भागाचे काम हाती घेणे मुश्किल झाले आहे. बांधकाम विभागाने पावसाळय़ानंतरच घाटरस्ता दुरुस्तीचे काम सुरू करण्यासाठीचे नियोजन केले आहे. या घाटमार्गावरून सध्या एसटी बसेस व छोटी वाहने सोडण्यात येत आहेत. घाटरस्ता खचलेल्या ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे घाटमार्गावर कोणताही धोका नसल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, पोलीस आणि बांधकाम विभागाचे अधिकारी या घाटरस्त्यावरून वाहने पूर्ववत सुरू होण्यासाठी प्रयत्न करत आहोत. खचलेल्या घाटमार्गावर पोलीस तैनात आहेत. मात्र, अवजड वाहने हाकणे योग्य नसल्याने या मार्गावरून सद्यस्थितीत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. सध्या गगनबावडा व करुळ घाटमार्ग धोकादायक झाले असून फोंडाघाट व आंबोली घाटमार्गाने वाहतूक सुरू आहे. त्यातही चाकरमानी परतीच्या प्रवासासाठी आंबोली घाटमार्गाला प्राधान्य देत असल्याने या मार्गाची सुरक्षितता आणखी वाढविणे आवश्यक आहे.

Related posts: