|Friday, February 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » राजापुरात पूरस्थिती कायम

राजापुरात पूरस्थिती कायम 

जवाहर चौकासह शिवाजीपथ, वरचीपेठ, गुजराळीतील रस्त्यांवर पुराचे पाणी

 वार्ताहर/ राजापूर

तालुक्यात सातत्याने पडणाऱया पावसामुळे शहरातील पूरस्थिती कायम आहे. शुक्रवारी पुराचे पाणी जवाहर चौकासह शिवाजीपथ, वरचीपेठ, शिळ, गुजराळी भागातील रस्त्यांवर होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसेच किनाऱयालगतची भातशेतीही पाण्याखाली गेली आहे. दरम्यान जिल्हाभरातही ठिकठिकाणी मुसळधार पाऊस सुरूच आहे.

राजापूर तालुक्यात गणेशोत्सवाच्या सुरूवातीपासून पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळात शहरात सातत्याने पूर येत होता. शनिवारी गौरी गणपती विसर्जनादिवशी पावसाने जोर धरला. त्यामुळे दुपारनंतर कोदवली नदीचे पुराचे पाणी जवाहर चौकापर्यंत आले होते. त्यामुळे शहरवासियांसह लगतच्या परिसरातील ग्रामस्थांना पुराच्या पाण्यातच गणेशमूर्तींचे विसर्जन करावे लागले. शनिवारपासून सततधार पाऊस सुरू असल्याने रविववारीही पुराचे पाणी ‘जैसे थे’ राहिले आहे. रविवारी सकाळी जवाहर चौकातील ध्वजस्तंभापर्यंत पुराचे पाणी होते. तसेच शिवाजीपथ, बंदर धक्का, वरचीपेठ, शिळ, गुजराळी आदी भागातील रस्त्यांवर पुराचे पाणी आल्याने रविवारी या मार्गावरील वाहतूक बंद झाली होती. पुराचे पाणी वाढू लागल्याने किनाऱयालगतच्या व्यापाऱयांनी दुकानातील सामान आधीच सुरक्षित स्थळी हलविले होते. त्यामुळे फारसे नुकसान झालेले नाही. मात्र सातत्याने दुकाने बंद ठेवावी लागत असल्याने मोठा आर्थिक फटका बसत आहे. प्रिंदावण, बांदीवडे परिसरातील सुख नदीला पूर आल्याने भातशेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले आहे. 

बदलत्या नदीपात्रामुळे बामणोलीत घरांना धोका

देवरूख: संगमेश्वर तालुक्यातील बामणोली नदीशेजारील घरांना बदलत्या नदीपात्रामुळे धोका निर्माण झाला असून रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यासंदर्भात तहसीलदार संदीप कदम यांना गावातील ग्रामस्थांनी निवेदन देवून लक्ष वेधले आहे. सद्यस्थितीत निरुपोगी असलेला कॉजवे व बदलत्या नदीपात्रामुळे पश्चिम घाट व मार्लेश्वर जोडणारा मुख्य रस्ता पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे ढासळत चालला आहे. तसेच लगतच्या घरांनाही धोका निर्माण झाल्याने रहिवाशांना जीव मुठीत धरुन रहावे लागत आहे. नदीपात्रात तयार झालेल्या भरावामुळे येथील नदीपात्र बदलून ग्रामस्थांचे नुकसान होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निरुपयोगी कॉजवे तसेच तयार झालेला भराव काढण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला देण्यात यावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

Related posts: