|Saturday, February 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रत्नागिरीत 100 फुटावर फडकला तिरंगा!

रत्नागिरीत 100 फुटावर फडकला तिरंगा! 

जिल्हाधिकारी कार्यालय आवारात उभारला ध्वजस्तंभ

रत्नागिरी/ प्रतिनिधी

आज जिल्हाधिकारी कार्यालय आवारामध्ये 100 फुट उंच ध्वजस्तंभ उभारण्यात आला. त्यामुळे रत्नागिरी शहराच्या इतिहासात आजचा दिवस खूपच महत्वपूर्ण आहे. या राष्ट्रीय ध्वजामुळे रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेले असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केले.

  रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उभारण्यात आलेल्या 100 फुट उंच ध्वजस्तंभाचे उदघाटन पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्याहस्ते करण्यात आले.  यावेळी विधान परिषद सदस्या हुस्नबानू खलिफे, आमदार राजन साळवी, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, उपविभागीय अधिकारी अमित शेडगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत कुलकर्णी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे, तटरक्षक दलाचे दांडेकर, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य सुखटणकर आदी उपस्थित होते. 

गेली 5 वर्षे रत्नागिरी जिह्याचा पालकमंत्री म्हणून कार्य करताना जिह्यातील नागरिक व आपल्या सहकाऱयांनी नेहमीच सहकार्य केले. अनेक विविध प्रसंगामध्ये या जिह्यातील नागरिकांनी आलेल्या संकटाला धैर्याने तोंड दिले. निसर्गाचे वरदान लाभलेल्या जिह्याचा विकास सदैव होत राहिल, असेही वायकर यांनी सांगितले.  आपल्या प्रास्ताविकात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी हा ध्वज उभारण्याच्या कामी सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानले. डी. के. फाऊंडेशनचे डॉ. राकेश बक्षी यांनी हा ध्वज उपलब्ध करुन दिला. याबद्दल जिल्हाधिकारी चव्हाण यांनी त्यांचे विशेष आभार मानले.

20-30 फुट आकाराचा हा ध्वज एनसीसी पॅडेटनी आणून पालकमंत्री वायकर व उपस्थित मान्यवरांकडे सुपूर्द केला. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी हा ध्वज पुढे आणला. यानंतर तांत्रिक पध्दतीने हा ध्वज ध्वजस्तंभावर चढवण्यात आला.   यावेळी डी. के. फाऊंडेशनचे डॉ. राकेश बक्षी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता दिलीप साळवी, कॉन्ट्रक्टर युवराज बोंद्रे, गोदुताई जांभेकर विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गोदुताई जांभेकर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी झांजपथक व लेझीम नृत्य सादर केले. या कार्यक्रमाला माजी सैनिक, स्वातंत्र्यसैनिक, तटरक्षक दल, पोलीस दल पत्रकार, एनसीसीचे विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

प्रत्येकाच्या चेहऱयावर देशाभिमान

हा 100 फूट उंच ध्वज फडकताना उपस्थित सर्व नागरिकांच्या चेहऱयावर आपल्या देशाप्रती असलेला अभिमान दिसून येत होता. येणारे-जाणारे नागरिक आवर्जून थांबून आपला देशाचा उंच फडकणारा झेंडा पाहतानाचे दृष्य येथे पहावयास मिळाले.

             प्रवासी जेटी दुरुस्ती कामाचे उदघाटन

यानिमित्ताने शहरातील मांडवीमधील प्रवासी जेटी दुरुस्त केलेल्या कामाचे उद्घाटन पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आमदार राजन साळवी, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल उपस्थित होत्या. 

Related posts: