|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » कोणतेही आव्हान मोडून काढण्यास भारत सज्ज

कोणतेही आव्हान मोडून काढण्यास भारत सज्ज 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हरियाणात नारा, विधानसभा निवडणूक प्रचाराचा केला प्रारंभ 

वृत्तसंस्था / रोहटक

 ‘नवा भारत’ कोणत्याही आव्हानाचा स्वीकार करण्यास सज्ज आहे. आम्ही आता अडचणींना आणि अडथळय़ांना घाबरत नाही. आव्हाने स्वीकारणे ही आमच्या अंगवळणी पडलेली बाब आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी हरियाणातील या शहरात भाजपच्या निवडणूक प्रचाराचा प्रारंभ केला. येत्या ऑक्टोबरमध्ये येथे विधानसभा निवडणूक होत आहे.

‘विजय संकल्प’ सभेत भाषण करताना त्यांनी शनिवारी मध्यरात्रीच्या चांद्रयान घटनेचा उल्लेख केला. चांद्रयान अभियानाच्या निमित्ताने सारा देश एकत्र झाल्याचे पहावयास मिळाले. अभियानात अडचणी आल्या तरी देशाचा आत्मविश्वास ढळला नाही. कोठूनही नकारात्मक सूर लागला गेला नाही. इस्रोच्या संशोधकांच्या प्रयत्नांचे आणि निर्धाराचे साऱया देशाने कौतुक केले. यातून देशाची एकात्मता दिसून आले. एक राष्ट्र एक संकल्प या घोषणेचेच ते प्रत्यंतर होते. हीच एकध्येयवादी भावना देशाला वेगाने प्रगतीच्या मार्गावर नेणार आहे, असे प्रेरणादायी प्रतिपादन त्यांनी केले. सभेला उपस्थित असंख्य नागरीकांनीही याला प्रतिसाद दिला.

100 दिवसांमध्ये मोठी झेप

भाजप व रालोआ सरकारच्या दुसऱया कालखंडाच्या प्रथम 100 दिवसांमध्ये देशाने मोठी झेप घेतली आहे. देशात विकासासंबंधीच्या विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून देशात मोठे परिवर्तन घडत असल्याचा हा संकेत आहे. निर्णय क्षमता, निर्धार, विकास आणि सदिच्छा या चार सूत्रांच्या साहाय्याने वाटचाल करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि कृषी क्षेत्र यांच्या संदर्भात अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यांचे परिणाम लवकरच दिसून येणार आहेत. दहशतवादाचा सामना करण्यासाठी अनेक कठोर कायदे करण्यात आले आहेत. तत्काल तलाकची पद्धत बंद करणे, घटनेचा 370 वा अनुच्छेद निष्प्रभ करणे, दहशवादविरोधी कायद्यात परिवर्तन करणे, अशी अनेक महत्वाची पावले याच 100 दिवसांमध्ये उचलण्यात आली, असे प्रतिपादन त्यांनी केले.

हरिणयातील विकासकार्याबद्दल त्यांनी तेथील सरकारचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचे कौतुक केले. मुख्यमंत्र्यांच्या जनआशिर्वाद यात्रेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने भाजपचा आत्वविश्वास दुणावल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Related posts: