|Friday, February 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » माढय़ाची जागा भाजपलाच ?

माढय़ाची जागा भाजपलाच ? 

बबनराव शिंदे यांच्या भाजप उमेदवारीची चर्चा  : जिंकण्याच्या फॉर्म्युल्यावर जागा वाटप

समीर कार्यकर्ते /सोलापूर

राज्यात भाजप आणि शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरु आहे, तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षाची अवस्था बिकट होत चालली आहे. एकीकडे राष्ट्रवादीच्या विचारांवर चालणारा जिल्हा म्हणून ज्याची राज्यात ओळख, त्या सोलापूर जिह्यातही भाजप प्रवेशासाठी रांगा लागल्या आहेत. एकंदरीत सत्तेशिवाय विकास नाही, असे म्हणत प्रवेश होत आहेत तर जिह्यात मतदारसंघाच्या वाटपावरुन दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. शिवसेनेला मागील दोन-तीन विधानसभा निवडणुकात पराभव पत्करावा लागल्याने माढा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडून भाजपकडे जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्याला कोणतेही नेते सध्या दुजोरा देत नसले तरी पण जिंकण्याच्या फॉर्म्युल्यावर हे जागा वाटप होत असल्याची माहिती आहे.

  माढा तसा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांना मानणारा पक्ष. येथील मतदार शरद पवार यांच्या नेतृत्वाला मानणारा आहे. तसाच तो येथील शिंदे आणि मोहिते-पाटील यांच्या वादाची आणि गटबाजीची किनार असलेला मतदारसंघ अशी ओळख आता होत आहे.

 लोकसभा निवडणुकीत रणजितसिंह निंबाळकर यांनी राष्ट्रवादीच्या संजयमामा शिंदे यांना पराभूत केले आणि शिंदे यांनी जमवलेल्या समविचारी आघाडीच्या हाती कमळ आले. त्यामुळे मोहितेंची सरशी झाली. मात्र त्यानंतर आता बदललेल्या राजकीय गणितात बबनराव शिंदे हेच भाजपाच्या गोटात सामील होण्याच्या तयारीत आहेत. तशा बैठकाही त्यांनी सुरु केल्या आहेत. त्यांना मुख्यमंत्र्यांनीही हिरवा कंदील दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता बबनदादा यांच्या प्रवेशानंतर भाजपालाच माढय़ाची जागा मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

 मात्र, शिवसेनेचे उपनेते व जिह्याचे सहपालकमंत्री तानाजी सावंत यांनी माढय़ाची जागा सोडणार नसल्याचे सांगितले आहे. त्या जागेवर त्यांचे बंधू शिवाजी सावंत हे निवडणूक लाढवण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे ते मतदारसंघासाठी आग्रही राहू शकतात. सावंत हे शिंदे यांचे पारंपरिक विरोधक आहेत. याशिवाय राष्ट्रवादीला आणि शिंदे गटाला विरोध असणार एक गट आणि मोहिते-पाटील यांचा गट शिंदे यांच्या उमेदवारीबाबत काय भूमिका घेतो, हे महत्वाचे असणार आहे.

 माढय़ातील बबनराव शिंदे यांच्या प्रवेशाने सर्वात मोठे नुकसान राष्ट्रवादीचे होणार आहे. कारण ज्या भरवशाच्या मानल्या जाणाऱया जागा आहेत, त्यात माढा मतदारसंघाचा समावेश आहे. असे असताना शिंदे यांनी पक्ष सोडून भाजपात जाणे वा अपक्ष निवडणूक लढवणे पवारांच्या विचारांवर असलेल्या मुलखात झालेली विचारांचीच हार मानली जाईल. सोपल आणि आता बबनदादा यांच्या जाण्याने सर्वात हानी राष्ट्रवादीची त्यांच्या होम पॉकेटमध्येच होत आहे आणि आता शिंदे यांच्या विरोधात जी फळी तयार झाली होती. त्या दुसऱया फळीतील नेत्यांवरच निवडणूक लढवावी लागणार आहे. 

  …तर 1995 ची पुनरावृत्ती 

जागा वाटपात जर सेना माढय़ाच्या जागेवर अडून बसली तर मात्र बबनराव शिंदे यांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागून 1995 सालची पुनरावृत्ती होऊ शकते. 1995 च्या निवडणुकीत कॉग्रेसबरोबर बंडखोरी करत शिंदे यांनी विजयी होऊन सेना-भाजपच्या सरकारला पाठिंबा दिला होता. 

दोनवेळा पराभव झालेली जागा बदलण्याचा फॉर्म्युला

ज्या जागांवर दोनवेळा भाजप वा सेनेचा पराभव झालेला आहे. त्या जागांची आदलाबदल होणार असल्याची माहिती आहे. त्याप्रमाणे माढा मतदारसंघाची जागा कमळाकडे जाऊ शकते.

Related posts: