|Friday, February 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » महिलेला चाकूचा धाक दाखवत सव्वालाख लंपास

महिलेला चाकूचा धाक दाखवत सव्वालाख लंपास 

प्रतिनिधी/ सातारा

सदरबझार येथील प्रसाद कॉलनीतील एका घरात मध्यरात्रीच्या सुमारास दोन अज्ञात चोरटय़ांनी एका घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. महिलेला चाकूचा धाक दाखवत तोंडाला रुमाल बांधून घरात घुसलेल्या 20 ते 25 वयोगटातील दोन चोरटय़ांनी घरातील रोख रक्कम सव्वालाख रुपये व महिलेच्या गळय़ातील नकली मंगळसूत्र चोरुन नेल्याची घटना घडली असून चोरटय़ांच्या या धाडसाने सदरबझार परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत तनुजा सलीम शेख (वय 29, रा. प्रसाद कॉलनी, सदरबझार, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी घटनेची दिलेली माहिती अशी, दि. 7 रोजी रात्री 11.30 च्या सुमारास जेवण झाल्यानंतर तक्रारदार महिलेचा पती बकरी हलाल करण्याच्या कामासाठी कसायाकडे निघून गेला. त्यानंतर महिला देखील आपल्या दोन मुली व मुलासमवेत झोपी गेल्या. रात्री 2 वाजण्याच्या सुमारास प्लास्टिक पिशवी वाजल्याचा आवाज आल्याने तनुजा शेख झाल्या. त्यावेळी त्यांच्यासमोर तोंडाला मास्क लावलेला इसम उभा होता. त्यामुळे शेख यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली असता चोरटय़ाने त्यांच्या गळय़ाला चाकू दाखवत पैसे कोठे आहेत असे खुणेने विचारले.

या घटनेमुळे शेख भयभीत झाल्या होत्या. तेवढय़ात चोरटय़ाच्या दुसऱया साथीदाराने शेख यांच्या तोंडावर बेडशीट टाकले व पैसे शोधण्यास सुरुवात केली.  चोरटय़ांनी कापडी पिशवीतील रोख 1 लाख 20 हजार रुपये व देवासाठी डब्यात ठेवलेले रोख चार हजार रुपये घेवून तेथून पोबारा केला. या घटनेनंतर शेख यांनी शेजारी नातेवाईक तसेच पतीला याबाबत माहिती दिले तोपर्यंत चोरटे पळून गेले होते. याबाबतची तक्रार शेख यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी दोन अज्ञात चोरटय़ांविरुध्द गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी चोरीचा तपास सुरु केला आहे. 

नकली मंगळसुत्र देखील सोडले नाही

चोरटय़ांनी घराच्या पाठीमागील दरवाजाच्या कडी काढून आता प्रवेश केला. आतील लाकडी दरवाजाचा कडीकोयंडाही तोडला. शेख यांना आवाजाने जाग आल्याने त्यांची हालचाल जाणवताच चोरटय़ांनी त्यांच्या गळय़ाला चाकू लावून धाक दाखवला. यावेळी त्यांच्या गळय़ात असलेले नकली मणीमंगळसुत्र हिसकावून नेले. चोरटय़ांना रोख रकमेवर डल्ला मारताना नकली मंगळसुत्र देखील सोडले नाही. या चोरटय़ांना आता काय करायचे असाच सवाल या कुटुंबियांना पडला.

Related posts: