|Saturday, September 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » तळेरे-कोल्हापूर मार्ग खुला

तळेरे-कोल्हापूर मार्ग खुला 

कळे येथे रस्त्यावर आलेले पाणी ओसरले : दोन दिवस ठप्प होता मार्ग

प्रतिनिधी / वैभववाडी:

कळे-कोल्हापूर येथील रस्त्यावर आलेले पुराचे पाणी ओसरल्यामुळे तळेरे- कोल्हापूर मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे. पुराच्या पाण्यामुळे गेले दोन दिवस ठप्प असलेला हा मार्ग मोकळा झाल्याने वाहन चालकांना व प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

काही दिवस कोसळणाऱया संततधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्र व कोकणला जोडणारे तालुक्यातील प्रमुख भुईबावडा व करुळ घाट दरडी कोसळल्यामुळे बंद होते. हे घाटमार्ग वाहतुकीस सुरळीत होत असतानाच कळे येथे रस्त्यावर पाणी आल्याने तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय मार्ग दोन दिवस ठप्प झाला होता. गणेशोत्सव काळात मुंबईस्थित चाकरमानी गावी येण्यासाठी व परतीच्या प्रवासासाठी याच मार्गाचा वापर करतात. या परतीच्या प्रवासादरम्यान मार्ग ठप्प झाल्याने चाकरमानी व वाहन चालकाची मोठी गैरसोय झाली होती. त्यांना पर्यायी फोंडाघाटमार्गे प्रवास करावा लागला होता.

दरम्यान, रविवारी सायंकाळी व सोमवारी पावसाने उसंत घेतल्याने कळे येथे रस्त्यावर आलेले पावसाचे पाणी ओसरू लागले होते. सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पाणी पूर्ण ओसरल्यामुळे कोल्हापूर मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली आहे. हा मार्ग सुरळीत सुरू झाल्याने वाहन चालक व प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.