|Saturday, February 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ‘कोल्हापुरी’ चप्पल उद्योगवाढीसाठी सरकार पाठिशी

‘कोल्हापुरी’ चप्पल उद्योगवाढीसाठी सरकार पाठिशी 

सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश खाडे यांची ग्वाही

प्रतिनिधी/ कोल्हापूर

कोल्हापुरात चर्मोद्योग शिक्षण व प्रशिक्षण केंद्राचा हा प्रकल्प पुणे विभागातील पहिला आहे. या उद्योगात इतर समाज मोठय़ा प्रमाणात उतरला आहे. चर्मकार समाजानेही विशेषत: युवकांनी आता या केंद्राद्वारे पुढे आले पाहिजे. या हस्तकलेला प्राधान्य असून, कोल्हापूर जवळच्या कर्नाटक, गोवा राज्यांमध्येही कोल्हापुरी चप्पलचा उद्योग वाढवला पाहिजे. त्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाचा सामाजिक न्याय विभाग नेहमीच पाठिशी राहील, अशी ग्वाही सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिली.

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या चर्मोद्योग, शिक्षण व प्रशिक्षण केंद्राच्या जागेचे भूमिपूजन व इमारत नकाशाचा अनावरण कार्यक्रम रविवारी सुभाषनगर येथे सामाजिक न्यायमंत्री खाडे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, लिडकॉमचे संचालक माजी आमदार बाबुराव माने, राजेश खाडे, दत्तात्रय गोतीसे, नगरसेविका सविता घोरपडे, कस्टमचे उपायुक्त गणपत चौगुले आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी राज्यातील 13 हजार गटई कामगारांसाठी स्टॉल देण्यात येणार आहेत, प्रत्येक जिह्यात संत रोहिदास महाराज स्मारक उभारणार असे सांगून चर्मोद्योग शिक्षण व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून युवकांनी चर्मोद्योगात यावे, असे आवाहन मंत्री खाडे यांनी केले.

आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार  म्हणाले, कोल्हापूरची चप्पल आणि गूळ जगात प्रसिध्द आहे. कोल्हापुरी चप्पलेला देशात चर्मकार समाजाने प्रथम क्रमांकावर नेले आहे. यासाठी या शिक्षण प्रशिक्षण केंद्राचा निश्चितच फायदा होईल. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून 570 जणांना 32 कोटीं रूपयाचे वाटप झाले आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, या शिक्षण, प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून चर्मोद्योगाला मोठय़ा प्रमाणात चालना मिळणार असून, याचा लाभ नव उद्योजकांनी जरुर घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी बाबुराव माने, दुर्वास कदम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. लिडकॉमचे व्यवस्थापकीय संचालक राजेश ढाबरे यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. यामध्ये लिडकॉमच्या कार्याची माहिती दिली. शेवटी वित्तीय सल्लागार व विशेष लेखा परीक्षक हणमंत कांबळे यांनी सर्वांचे आभार मानले.

Related posts: