|Friday, February 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ‘प्रोसिडींग’वरून शिक्षक बँकेच्या सभेत गोंधळ

‘प्रोसिडींग’वरून शिक्षक बँकेच्या सभेत गोंधळ 

‘नोकरभरती’च्या प्रश्नांवर घोषणाबाजी

प्रतिनिधी/ कोल्हापूर

गतवर्षीच्या प्रोसेडिंगमध्ये सभासदांच्या प्रश्नांना डावलले अन् नोकरभरतीवरून दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या रविवारी झालेल्या 81 व्या वार्षिक सभेत प्रचंड घोषणाबाजी झाली, दीड तासांत घोषणाबाजी अन् गोंधळातच सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली. पोलीस बंदोबस्त अन् कारवाईच्या नोटीसीने सुरू झालेल्या वादाला नोकरभरतीच्या प्रश्नाद्वारे गोंधळाची संधी मिळाली अन् नोकरभरती बंद करा, अशा घोषणाबाजीतच सभेची सांगता झाली.

दि प्राथमिक शिक्षक बँकेची वार्षिक सभा शाहूपुरी गवत मंडई येथील आयर्विंन मल्टीपर्पज हांलमध्ये अध्यक्ष दिलीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष बाजीराव कांबळे, साहेब शेख, शिवाजी पाटील, राजमोहन पाटील, बजरंग लगारे, संभाजी बापट, आण्णासो शिरगावे, नामदेव रेपे, गणपती पाटील, अरूण पाटील, प्रसाद पाटील, धोंडीराम पाटील, प्रशांतकुमार पोतदार, सुरेश कोळी, स्मिता डिग्रजे, लक्ष्मी पाटील, तज्ञ संचालक बी. एस. पाटील, संभाजी सिद, ऍड. संदीप पाटील, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत कुलकर्णी उपस्थित होते. बँकेचे संस्थापक स्व. डी. आर. भोसले यांच्या प्रतिमेचे पूजन अन् दीप प्रज्वलनाने सभेला सुरूवात झाली. उपाध्यक्ष बाजीराव कांबळे यांनी स्वागत केले.

सभेला दोन वाजता सुरूवात झाली. स्वागत सुरू असतानाच शिक्षक संघाचे सुनील पाटील, रवी पाटील यांनी पोलीस बंदोबस्त अन् कारवाईच्या नोटिसीवरून वादाला सुरूवात केली. स्टेजवर माईक हिसकावण्याचा प्रकार सुरू होताच अध्यक्ष दिलीप पाटील यांनी प्रास्ताविकात याची उत्तरे देऊ, असे सांगितले. पोलिसांनीही व्यासपीठाकडे धाव घेतल्यानंतर सभा सुरू झाली.

संचालकांवर ठपका नको म्हणून कारवाईच्या नोटीसा

अध्यक्ष दिलीप पाटील म्हणाले, बँक बचाव कृती समितीने सभा उधळून लावण्याचा इशारा दिला होता, त्याची दखल घेत बँक प्रशासनाने पोलिसांना कळवले, त्यातूनच प्रेस घेणाऱयांना कारवाईची नोटीस दिली आहे. सभा अवैधरित्या उधळली असती तर त्याचा ठपका संचालकांवर आला असता, असे सांगितले.

चौदा टक्के लाभांशाच्या घोषणेचे स्वागत

नऊ वर्षे बँकेत नोकरभरती नव्हती, ही नोकरभरती पारदर्शकपणे केली, सभासदसंख्या वाढली, ठेवीही वाढल्या आहेत. सभासदांना 14 टक्के लाभांश देण्याची घोषणा करताच त्याचेही सभासदांनी टाळय़ांच्या गजरात स्वागत केले. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 1 लाख रूपये दिले, कर्मचाऱयांसमवेत करार केला, निवृत्ती पेन्शनचा प्रश्न सोडवल्याचे सांगितले.

अर्धा तास प्रोसिडींग वाचन

प्रास्ताविकात त्यांनी सभेपुढील विषयांचे वाचन केले. यावेळी नोकर भरतीवर बोलणार, असे सांगत असतानाच मंजूर-नामंजूरच्या घोषणेत विषयपत्रिकेवरील विषय मंजूर करण्यात आले. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी इतिवृत्त, अर्थात प्रोसिडिंग वाचन सुरू केले. सुमारे अर्धा तास ते सुरू हेते.

गत प्रोसिडिंगमध्ये प्रश्न नसल्यावरून गोंधळ, प्रोसेडिंग बोगसचा आरोप

गतवर्षीच्या प्रोसिंडींगचे वाचन सुरू असतानाच सभासदांना माईक द्या, अशी मागणी सुरू झाली. यावेळी माईक एका बाजूला अन् केबल दुसरीकडे असे चित्र होते, गोंधळ वाढताच शिक्षक संघाच्या रवी पाटील यांना माईक देण्यात आला. त्यांनी गतवर्षी दिलेले 10 प्रश्न प्रोसिडिंगमध्ये आलेच नसल्याचे सांगताच गोंधळाला सुरूवात झाली. रवी पाटील यांनी प्रोसेडिंगच खोटे, बोगस असल्याचे सांगताच जोतिराम पाटील अर्जून पाटील आदींनीही विरोध सुरू केला. या गोंधळातच प्रोसिडिंग वाचन सुरू राहिले.

स्टाफिंग पॅटर्न मंजुरी नाही, तरीही नोकरभरती कशी?

जोतिराम पाटील यांनी स्टॉफिंग पॅटर्नला गतसभेत मंजुरी दिलेली नाही.  नोकरभरती करतो, असा शब्दही दिला नसल्याचे सांगितले. याच नोकरभरतीवरून घोषणाबाजी सुरू झाली. विरोधक घोषणा देत मागे गेले. तेथे सर्वांनीच ‘नोकर भरती बंद करा, संचालक चोर है,’ अशी घोषणाबाजी सुरू झाली. अध्यक्ष दिलीप पाटील हे सभासदांच्या प्रश्नाला उत्तरे देत असतानाच त्यांनी आभार मानले. विरोधकांनी एकत्रित व्यासपीठाकडे धाव घेताच राष्ट्रगीत सुरू झाल्याने सभा गोंधळातच संपली. सभेनंतरही सत्ताधारी-विरोधकांत घोषणाबाजी सुरूच राहिली.

माईकचा आवाज कमी, कॉड काढल्याने गोंधळ

सभासद श्वेता खांडेकर यांनी कर्जावरील व्याजासंदर्भात प्रश्न केला, पण त्यांच्याही प्रश्नाला बगल दिली. 14 टक्के लाभांश कसा, याचेही उत्तर संचालकांनी टाळले. आयत्यावेळचे प्रश्न नंतर विचारा, असे सांगितले. माईकचा आवाज कमी करत त्याची कॉड बाजूला केल्याने विरोधक मागे गेले. विरोधकांनी एकत्र येत घोषणाबाजीद्वारे नोकरभरतीला विरोध दर्शवला.

सहकार कायद्यानुसारच नोकर भरती : दिलीप पाटील

सभेनंतर बँकेने सहकार कायद्यानुसार नोकर भरती केली आहे. पंधरा वर्षांत 61 कर्मचारी निवृत्त झाले, त्यामुळे 30 पदे भरणे आवश्यक होते, या जागांसाठी ऑनलाईन 564 अर्ज आले होते. त्यातील 491 अर्ज पात्र ठरले, 73 जण परीक्षेला गैरहजर होते. 93 पेकी गुणवत्तेनुसार 36 जणांची निवड केले. पारदर्शक पद्धतीनेच नोकरभरती केल्याचे बँकेंचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी सांगितले.

सभासदांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न

माईक न देणे, आवाज कमी करणे, या प्रकारांतून सभासदांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सत्ताधाऱयांनी केला. निव्वळ नफा कमी असताना, 14 टक्के लाभांश देणार कसा, यातून बँक भविष्यात अडचणीत येईल, अशी भीती काहींनी व्यक्त केली. मेगा नोकरभरतीतून सत्ताधाऱयांनी उखळ पांढरे करून घेतल्याचा आरोप अर्जून पाटील, जोतीराम पाटील, रवी पाटील, विजयकुमार गोरड, बळवंत शिंत्रे यांनी केला.

47 लाखांच्या वसुलीचे खापर सभासदांवर : शिक्षक सेनेचा आरोप

राज्य शिक्षक सेनेने ‘सभेत तीन वर्षांपुर्वी तक्रार केली होती. त्यात कलम 83 अन्वये 47 लाखांच्या चौकशीप्रकरणी संचालकांवर सहायक निबंधकांनी सामुदायिक जबाबदारी टाकली होती, त्याआधारे जबाबदारी निश्चितीसाठी मनोहर माळी यांची नियुक्ती केली होती, पण चैकशीत 47 लाखांचे खापर संचालकांनी सभासद, वार्षिक सभेवर फोडले आहे. संचालक बँकिंग क्षेत्रात अनभिज्ञ असतील तर त्यांनी राजिनामा द्यावा, अशी मागणी सरचिटणीस रवी शेंडे यांनी पत्रकाद्वारे केली.

Related posts: