|Saturday, February 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » शहरातील खड्डय़ांविरोधात नागरिकांचे छत्री आंदोलन

शहरातील खड्डय़ांविरोधात नागरिकांचे छत्री आंदोलन 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

रत्नागिरी शहरातील रस्त्याच्या झालेल्या दुर्दशेबाबत तीव्र संताप व्यक्त करत नागरिकांनी सोमवारी नगर परिषदेवर धडक दिली. शहरातील खड्डय़ांविरोधात छत्री आंदालन छेडत नागरिकांनी सत्ताधाऱयांचा निषेध करत नगराध्यक्षांना याबाबत जाब विचारला. येत्या आठ दिवसांत खड्डे न बुजवल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला.

 शहरातील रस्त्यांना पडलेले खड्डे, त्यांची डागडुजी व पुन्हा पडणारे खड्डे यामुळे शहरवासीय त्रस्त झाले आहे. या खड्डय़ांमुळे अनेकदा अपघातांना निमंत्रण मिळत आहे. गणेशोत्सवापुर्वी सर्व खड्डे भरण्याचे आश्वासन देण्यात आले, मात्र गणेशोत्सव संपत आला तरीही खड्डे कायमच आहेत. त्यामुळे याविरोधात आंदोलन करण्याच निर्णय घेण्यात आला. आंदोलनात सहभागी होण्यासाठी सोशल मिडियाद्वारे त्रस्त झालेल्या शहरवासियांना आवाहनही करण्यात आले होते. या आवाहनाला सोशल मिडीयावर मोठा प्रतिसाद मिळाला मात्र प्रत्यक्षात फारच कमी संख्येने लोक आंदोलनात सहभागी झालेले दिसले.

 निवडक नागरिकांनी सोमवारी नगर परिषदेवर धडक देत न.प.च्या कारभाराचा निषेध केला. शहरात निर्माण झालेल्या खड्डेमय रस्त्यांना सर्व नगरसेवकांना जबाबदार धरण्यात आले. शहरात सर्व रस्त्यांवर आज प्रचंड खड्डे पसरलेले आहे. अतिवृष्टी आणि लोकसभा निवडणूक आचारसंहितेचे कारण दिले जात आहे. मागील वर्षीच्या पावसाळय़ात पडलेले खड्डे दुरूस्तीचे काम करताना न.प.चा कोणीही अभियंता वा जबाबदार अधिकारी उपस्थित नसतो. त्यामुळे कंत्राटदार मनमानी  करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी प्रभारी नगराध्यक्ष बंडय़ा साळवी यांनी आंदोलकांना सामोर जात त्यांच्या भावना जाणून घेतल्या.

  सातत्याने पावसाळी खड्डे भरण्याच्या कामावर होणाऱया खर्चाचे प्रमाण दरवर्षी सातत्याने वाढत आहे. खड्डे का पडतात याची तांत्रिक कारणे शोधून त्यावर उपयायोजना केली जात नाही. नगर परिषदेच्या असंवेदनशील, ढिसाळ  कारभारामुळे सार्वजनिक आणि खासगी पायाभूत सुविधांना होणाऱया नुकसानीची जबाबदारी न.प.प्रशासनाची आहे. त्यासाठी येत्या 7 दिवसांत रस्त्यांवरील खड्डे न.प.जबाबदार अभियंता किंवा अधिकाऱयांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली ठेकेदाराच्या खर्चाने विनामूल्य भरून घ्यावेत अशी मागणी यावेळी साळवी यांच्याकडे केली. त्यावेळी नागरिकांचे म्हणणे ऐकून न.प.च्या बाहेर आलेल्या प्रभारी नगराध्यक्ष बंडय़ा साळवी यांच्याकडे तीव्र भावना व्यक्त केल्या. या आंदोलनाचे नेतृत्व राजू किर यांनी केले. त्यावेळी बंटी वणजू, अभिजित हेगशेटय़े, नंदकुमार साळवी, सुखदा देव, राकेश चव्हाण, कौस्तुभ सावंत आदींची उपस्थिती होती.  

सोशल मिडीयावर सक्रीय, आंदोलनातून दूरच

  या आंदोलनावेळी काही जागरूक नागरिक वगळता अत्यंत कमी संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. एक लाखांची लोकवस्ती असणाऱया शहरात खड्डय़ांच्या विरोधात आंदोलन करण्यसाठी केलेल्या आंदोलनात फक्त 30 छत्र्या उघडल्या गेल्या. संपूर्ण रत्नागिरीत खडय़ांचे साम्राज्य असताना सोशल नेटवर्क वर संतापाची लाट उमटल्याचे चित्र मागील दोन दिवसांपासून दिसत होते. मात्र रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तेव्हा अत्यंत कमी संखेने काही जागरूक नागरिक एकत्र आल्याची स्थिती या आंदोलनावेळी दिसून आली.

7 दिवसांत खड्डे भरा, अन्यथा न्यायालयात जाणार-राजू किर

गेल्या 2 महिन्यांपासून शहरात रस्त्यांची खड्डय़ांनी चाळण झाली आहे. सर्वत्र रस्ते खड्डेमय झालेत. त्यामुळे जनता त्रस्त आहे. त्या कारभाराचा नागरिकांकडून आम्ही निषेध व्यक्त करत आहात. येत्या 7 दिवसांत न.प.ने संबधित ठेकेदारामार्फत रस्त्यांचे खड्डे पुन्हा बुजवण्याचे आदेश दय़ावेत. अन्यथा त्याविरोधात न्यायालयात जाऊन त्या ठेकेदाराला जनतेसमोर नतमस्तक व्हायला भाग पाडले जाईल असे राजू किर यांनी ठणकावले आहे.  

निर्भिडपणे रत्नागिरीकरांनी रस्त्यावर यावे-अभिजित हेगशेटय़े

आज एन्रॉनच्या काळात झालेला गुहागर येथील रस्ता 20 वर्षांनंतरही कोणत्याही दुरुस्तीविना सुस्थितीत राहतो. मग आमच्या शहरातील रस्त्यांचे डांबर पाण्यात विरघळते की काय? असा सवाल आहे. त्यामुळे जे जड आहे, ते मुळासकट उखडवायचे आहे. रस्त्यांचे काही वितळणारे डांबर आज थांबवायचे आहे. त्यामुळे काहींची मने दुखावतील, काहींना राग येईल, काहीजण नाराजही होतील, तर आपले संबध का बिघडवायचे म्हणून प्रश्न पडेल. पण रत्नागिरीकर म्हणून एकत्र येऊन निर्भिडपणे रस्त्यावर उतरा, जर सहन करत राहिलात तर प्रश्न गंभीर बनेल.

Related posts: