|Saturday, February 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » शंभू राजांच्या पराक्रमाची ज्योत तेवत राहिल

शंभू राजांच्या पराक्रमाची ज्योत तेवत राहिल 

पालकमंत्री वायकर यांचे प्रतिपादन, कसब्यात पुर्णाकृती पुतळय़ाचे अनावरण

वार्ताहर/ संगमेश्वर

मी स्वतः शिवभक्त असून जिल्हय़ात राजापूर आणि चिपळूण येथे शिवपुतळे बसवण्याचे भाग्य लाभले. हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभू राजांच्या पूर्णाकृती पुतळय़ाचे कसब्यात अनावरण करताना अत्यानंद होत आहे. या पुतळय़ाच्या माध्यमातून पर्यटन विकासात मोठी भर पडलेलच शिवाय संभाजी राजांच्या पराक्रमाची ज्योत सर्वांसमोर अखंड तेवत राहील असे प्रतिपादन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केले.

कसबा येथील छत्रपती संभाजी महाराज पुर्णाकृती पुतळयाच्या लोकार्पण सोहळय़ानिमित्त आयोजित कार्यक्रमात वायकर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस अधिक्षक प्रवीण मुंढे, अधिक्षक अभियंता जे. डी. कुलकर्णी, आमदार सदानंद चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरुपा साळवी, मुंबईच्या माजी महापौर श्रध्दा जाधव, राजेंद्र महाडिक, बंडा महाडिक, नेहा माने, वेदा फडके, प्रमोद पवार, संतोष थेराडे, रोहन बने, मराठा क्रांन्ति मोर्चा राज्य समन्वयक सुधीर भोसले आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना पालकंमत्री म्हणाले की, पुतळय़ासाठी 16 लाख रूपये स्वतः खर्च केला आहे. या परिसरात सुशोभिकरणासाठी नियोजनच्या माध्यमातून 88 लाख रुपये मंजूर केले आहेत. याशिवाय येथे विद्युत रोषणाईसाठी आणखी निधी देवू असे सांगत त्यांनी आपल्या कारकिर्दीत जे जे शक्य झाले ते ते काम पूर्ण केल्याचे सांगितले.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले. कसब्यात पूर्णाकृती पुतळा बसवण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व मदत तातडीने करण्यात आली. यापुढेही कसब्याच्या पर्यटन विकासासाठी कायम सहकार्य राहील.

आमदार सदानंद चव्हाण यांनी हा दिवस कसब्यासाठी सुवर्णक्षण असल्याचे  सांगितले. अनेक वर्षांपासूनचे कसबावासियांचे पूर्णाकृती पुतळय़ाचे स्वप्न पालकमंत्री वायकर यांच्या माध्यमातून पूर्ण झाले. गेल्या 5 वर्षात वायकर यांनी जिल्हय़ात विकासाचा नवा मापदंड तयार  केला. कसबा वासियांनी मागणी करताच स्वतःच्या खिशातील 16 लाख रुपये खर्च करुन हा पुतळा दिला.

 कार्यक्रमात संभाजी राजे प्रतिष्ठानच्यावतीने पालकमंत्र्यांचा शाल, श्रीफळ, मानपत्र, सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.

कसबा येथे संभाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा उभारणे आणि परिसर सुशोभिकरण कामाला 21 मार्च 2018 ला प्रशासकिय मान्यता मिळाली.  जिल्हा नियोजनमधून 88 लाख 85 हजार 800 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला संगमेश्वरमधील ठेकेदार संदीप रहाटे यांनी हे काम हाती घेतले. पुतळय़ासाठी 16 लाख रुपये खर्च आला असून तो पालकमंत्री वायकर यांनी स्वतः केला आहे.  दोन दिवसापुर्वी पुतळा मुंबईतून कसब्यात आणण्यात आला. त्यानंतर दोन दिवस कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु होती. मुसळधार पावसातही कार्यक्रमाला शेकडों शिवप्रेमी उपस्थित होते.

Related posts: