|Friday, February 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » भास्कर जाधव शुक्रवारी बांधणार शिवबंधन!

भास्कर जाधव शुक्रवारी बांधणार शिवबंधन! 

चिपळुणात कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत घोषणा – कोकणात राष्ट्रवादीत भूकंप

प्रतिनिधी/ चिपळूण

  राज्याचे माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व गुहागर मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधवांचा शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त अखेर निश्चित झाला आहे. 13 सप्टेंबर रोजी मुंबईतील सेनाभवनात जाधव शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शरद पवारांशी चर्चा करून राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतल्याचे सोमवारी पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्ट केले. जाधव यांच्या शिवसेना प्रवेशाने कोकणातील राष्ट्रवादीत भूकंप झाला आहे.

  गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीत नाराज असलेल्या आमदार जाधव यांच्या स्वगृही परतण्याबाबतच्या चर्चा सुरू होत्या. दोन आठवडय़ापूर्वी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याबरोबर त्यांनी तासभर चर्चा केल्यानंतर त्यांच्या शिवसेना प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले होते. मात्र, कुटुंबिय, जुने सहकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले होते.  त्यानुसार सोमवारी जाधव यांनी शहरातील पाटीदार भवनात कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या पत्रकारपरिषदेत राजकीय वाटचालीची दिशा स्पष्ट केली.

 राष्ट्रवादी सोडताना कुणावरही नाराज नाही. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी चर्चा करून लिखित स्वरूपात म्हणणे मांडले आहे. मी कधीही पदे मागितली नाहीत, पण पक्षाने काम पाहून मला पदे दिली. माझ्या ताटात अनेकांनी हात घातले असले तरी मी कुणाच्याही ताटातून पद हिसकावून घेतलेले नाहीत. गेली 40 वर्षे राजकारणात वावरताना कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही. कार्यकर्त्यांनीही विकासाची भूक आपणच भागवू शकता, त्यामुळे आपण घ्याल तो निर्णय मान्य असेल असे सांगत त्यांनीही शिवसेनेत प्रवेशासाठी  आग्रह धरला. आपण पूर्वाश्रमीचे शिवसैनिकच असल्याने स्वगृही परतण्याचा निर्णय घेताना आनंद होत असल्याचे जाधव यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

  आपल्यासोबत 9 जिल्हा परिषद सदस्य, गुहागर पंचायत समिती तसेच मतदार संघातील 73 सरपंच असल्याचा दावाही त्यांनी केला.  मतदार संघातील गुहागर तालुक्यीतल सर्वच तर खेड आणि चिपळुणातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी लवकरच राजीनामे देतील. जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांचा पक्षप्रवेश तांत्रिक बाबी तपासून नंतर होणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

 शिवसेना प्रवेशानंतर कोठून लढणार यावर बोलताना ते म्हणाले की, तो निर्णय माझ्या हातात नाही. पक्षप्रमुख उमेदवारीबाबत जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल. जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते असलेले चिरंजीव विक्रांत जाधव यांच्या उमेदवारीबाबतच्या प्रश्नावर बोलताना राजयोग असेल तर तो आमदार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवसेनेत गेल्यानंतर जुन्या-नव्या वादाबाबत बोलताना ते म्हणाले की, मी राष्ट्रवादीत असलो तरी माझ्या मतदार संघात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी वाद आहेत असे एकही कार्यकर्ता सांगू शकत नाही. त्यामुळे वादाचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

  यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस फैसल कास्कर, जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते विक्रांत जाधव, राजू आंब्रे, सदस्या नेत्रा ठाकूर, मिनल काणेकर, पुनम चव्हाण, निकिता सुर्वे, विभावरी मुळय़े, माजी सभापती बळीराम शिंदे, माजी उपसभापती संतोष चव्हाण, शशिकांत दळवी, धाकटू खताते, भरत गांगण, मिलिंद कापडी, महेंद्र कदम, जयदेव मोरे, बावा कदम, दशरथ दाभोळकर आदी उपस्थित होते.

आमदारकीचा राजीनामा देऊन शुक्रवारी प्रवेश

  शुक्रवारी सायंकाळी आमदार जाधव आपल्या समर्थकांसह मुंबईतील सेनाभवनात पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. तत्पूर्वी ते सकाळी आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार आहेत. 

 भास्कर जाधवांचा राजकीय प्रवास

  1982मध्ये शिवसेना कार्यकर्ता म्हणून राजकारणाला प्रारंभ केल्यानंतर भास्कर जाधव यांनी शिवसेना विभागप्रमुख, चिपळूण तालुकाप्रमुख, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद विरोधी पक्षनेता असा प्रवास केला. 1995 आणि 1999मध्ये चिपळूण विधानसभा मतदार संघातून आमदार म्हणून ते विजयी झाले. मात्र 2004 मध्ये उमेदवारीबाबतच्या संभ्रमातून सेनेला रामराम ठोकत अपक्ष म्हणून रिंगणात उतरले.  16 जून 2005 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांची राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस म्हणून निवड झाली. त्यानंतर कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून विधान परिषदेवर निवडून गेले. 2009मध्ये गुहागर विधानसभा मतदार संघातून विजयी झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळात राज्यमंत्र्यासह पॅबिनेट मंत्रीपदाची धुरा सांभाळली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदही त्यांनी भूषवले. ऍाक्टोबर 2014 मध्ये ते पुन्हा गुहागर मतदार संघातून विजयी झाले.

Related posts: