|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » दीपक केसरकरांची ‘कुंडली’ माझ्याकडे!

दीपक केसरकरांची ‘कुंडली’ माझ्याकडे! 

नगराध्यक्ष साळगावकर यांचा घणाघात : म्हणाले, त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर आणणार!

माझ्या ‘त्या’ भेटीमागे त्यांचे षड्यंत्र, त्याचे परिणाम भोगतोय!

वार्ताहर / सावंतवाडी:

मी गेले 35 दिवस ज्या काही यातना भोगत आहे, त्याला पालकमंत्री दीपक केसरकरांची ‘जादू’च कारणीभूत आहे. त्यांनी माझी अलिकडे घेतलेली भेट हा राजकीय षड्यंत्राचाच भाग होता. तेव्हापासून मी व्यथित झालो आहे. वरकरणी शांत वाटणाऱया केसरकरांचा खरा चेहरा वेगळाच आहे. त्यांच्याविरोधात मी निवडणूक लढणार असल्याचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. केसरकर यांच्या कृत्यांची कुंडली माझ्याकडे आहे. ती वेळ आल्यावर उघडेन. मी त्यांच्यासोबत होतो म्हणूनच ते मंत्री बनू शकले. आता मी त्यांच्यासोबत नसल्याने त्यांचा पराभव अटळ असल्याचा दावाही साळगावकर यांनी केला. यावेळी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, सभापती आनंद नेवगी उपस्थित होते.

साळगावकर म्हणाले, 4 ऑगस्टला केसरकर यांनी संपूर्ण एक दिवस हॉटेल रत्नेशमध्ये गुप्तभेट घेतली. त्यामागे त्यांचे मोठे षड्यंत्र होते. या षड्यंत्रामुळे मी व्यथित झालो आहे. माझी भेट घेण्यासाठी केसरकर यांनी मला सर्व ठिकाणी शोधले. मात्र, ते भेटल्यापासून आतापर्यंत मी कठीण परिस्थितीतून जात आहे. मला आता बोलायलाही येत नाही, एवढी स्थिती झाली आहे. केसरकर हे चांगले जादूगार आहेत. त्यांना फक्त सत्ता दिसते. त्यांनी चांगले काम केले असते तर आज त्यांच्यावर मला भेटण्याची वेळ आलीच नसती.

नगरपालिकेत हस्तक्षेप बैठकीचं नाटक

साळगावकर पुढे म्हणाले, केसरकर नगरपालिकेच्या कारभारात हस्तक्षेप करतात. गेल्या महिन्यात त्यांनी दोन बैठका ठेवल्या होत्या. त्या बैठकांतून काहीच निष्पन्न झालेले नाही. या बैठका घेण्यामागे माझी भेट व्हावी, असाच त्यांचा हेतू होता. व्यापारी, नागरिकांच्या हितासाठी बैठक नव्हती. माझी भेट व्हावी म्हणून बैठकीच्या आदल्या दिवशी 15 ऑगस्टच्या आधी त्यांचे मुंबईतील पीए ठाकुर माझ्याकडे आले. त्यानंतर केसरकर यांनी माझी भेट घेतली. तेव्हापासून मी झळा सोसत आहे. गेले 35 दिवस मी काय भोगतोय, याची कल्पनाच न केलेली बरी.

केसरकरनी आपल्या जादूने अनेकांना संपविले!

केसरकर यांचा स्वभाव शांत, प्रेमळ असल्याचे सर्वांना वाटते. मात्र, प्रत्यक्षात त्यांचा चेहरा वेगळाच आहे. ते आपला खरा चेहरा दाखवत नाहीत. केसरकरनी अनेकांना आपल्या जादूने संपविले. त्याचा घटनाक्रम माझ्याकडे आहे. त्यांनी शिवसेना प्रवेशाआधी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची घेतलेली भेट हीदेखील ‘जादू’च होती, असेही साळगावकर म्हणाले.

उद्योगपती अवधूत तिंबलोंवरही जादू

साळगावकर म्हणाले, गोव्याचे उद्योगपती अवधूत तिंबलो हे केसरकरांचे चांगले मित्र असूनही त्यांच्यावरही त्यांनी ‘जादू’ केली. तेसुद्धा माझ्यासारखेच केसरकरांच्या वागणुकीने व्यथित आहेत. त्यांनी तसे मला बोलून दाखवले आहे. मी त्यांना सांगू इच्छितो की, तुम्ही केसरकरांच्या दुसऱया चेहऱयाची सत्यता जनतासमोर येऊन एकदा सांगा.

13 वर्षांपासून अलिप्त

साळगावकर म्हणाले, केसरकरांच्या एकंदर वागणुकीमुळे मी गेल्या 13 वर्षापासून अलिप्त आहे. त्यांची मागून वार करण्याची प्रवृत्ती योग्य नाही. त्यांच्या पाठीशी आम्ही होतो, म्हणून ते नगराध्यक्ष, आमदार, मंत्री होऊ शकले. जेव्हा केसरकर नगराध्यक्ष झाले, तेव्हा त्यांच्यासोबत कुणीही नव्हते. माझ्यासह तिघा नगरसेवकांनी त्यांना साथ दिली. त्यांना सर्व प्रकारचे संरक्षण दिले. तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या सूचनेनुसार मी, उमेश कोरगावकर व अनिता भाईडकर असे केसरकर यांच्यासोबत होतो. त्यावेळी शिवसेनेच्या मंडळींचा केसरकरांना पाठिंबा देण्यास विरोध होता. आम्ही त्यावेळी साथ दिली नसती तर केसरकर मंत्री दिसलेच नसते. त्यांच्या पहिल्या आमदारकीला आम्ही जीव तोडून काम केले होते.

केसरकरांची देवावर श्रद्धाच नाही!

केसरकर हे फक्त देवभक्तीचे नाटक करतात. सत्तेसाठी ते कोणत्याही पातळीवरची कला साकारू शकतात. त्यांचा देव परगृहावर आहे, असा टोलाही साळगावकर यांनी लगावला. सावंतवाडी शहरात ड्रग्ज-गांजासारखे प्रकार सुरू आहेत, याबाबत ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो यांनी बैठकीत मुद्दा मांडला तेव्हा केसरकर यांनी दबाव आणून हे प्रकरण मिटविले.

केसरकरांच्या ‘जादू’मुळे राणेंचा प्रवेश कठीण

साळगावकर म्हणाले, केसरकरांची ‘जादू’ अनेकांनी भोवली आहे. आता तर त्यांनी नारायण राणे यांच्यावरही ‘जादू’ केली आहे. केसरकरांच्या ‘जादू’मुळे राणेंचा भाजप प्रवेश कठीण आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष संजू परब यांनी केसरकरांबाबत जरा सबुरीने घ्यावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

मी विरोधात उभा राहणारच!

मी आता केसरकरांच्या ‘जादू’ला घाबरणार नाही. त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर यावा, यासाठीच मी बोललो. मी आता त्यांच्याविरोधात उभा राहणार आहे. माझी निष्ठा, प्रेम राष्ट्रवादी काँग्रेसशी आहे. निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी माझी बोलणी सुरू आहेत, असेही साळगावकर म्हणाले.

गेल्या पाच वर्षात विकासकामे केली नाहीत आणि आता निवडणुकीच्या तोंडावर ज्या कामांचे काहीच नियोजन नाही त्याची उद्घाटने, भूमिपूजने करत आहेत. केसरकर भातुकलीच्या खेळाप्रमाणे भूमिपूजने करत आहेत, अशी टीकाही केसरकर यांनी केली.

Related posts: