|Saturday, February 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » फलटण-लोणंद रेल्वे उद्यापासून नियमित धावणार

फलटण-लोणंद रेल्वे उद्यापासून नियमित धावणार 

 खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची माहिती

प्रतिनिधी/ फलटण

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा रेल्वेचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून दि. 11 रोजी दुपारी 2 वाजता प्रत्यक्ष रेल्वे गाडी फलटण ते लोणंद या रेल्वे मार्गावरून धावणार असल्याची माहिती सोलापूर विभागीय रेल्वे मंडळाचे अध्यक्ष व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.

दि. 11 रोजी रेल्वे प्रत्यक्ष या मार्गावरून धावणार असल्याच्या पार्श्वभूमीवर वाठार निंबाळकर येथील आयुर ट्रेडर्स येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत खासदार नाईक निंबाळकर हे बोलत होते. यावेळी स्वराज संघटनेचे दिगंबर आगवणे, भाजपचे बजरंग गावडे, सुशांत निंबाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव पोकळे, उत्तम भोसले उपस्थित होते.

खासदार रणजितसिंहांनी सांगितले की, रेल्वेचे उद्घाटन माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या हस्ते व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याचे नमूद करीत रेल्वेच्या प्रोटोकॉलप्रमाणे तालुक्यातील सर्व मान्यवर नेते मंडळींना या उद्घाटन सोहळ्यास निमंत्रित करण्यात येणार असून या ऐतिहासिक सोहळय़ास सर्व उपस्थित राहतील अशी अपेक्षा व्यक्त करीत आठवडय़ाभरात फलटण-लोणंद-नीरा-पुणे अशी रेल्वे नियमित धावेल तसेच लवकरात लवकर फलटण पंढरपूर अशी रेल्वे धावण्याच्या दृष्टीनेही आपण प्रयत्नशील असल्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.

या रेल्वेच्या नियमित वाहतुकीमुळे शेतमालाला पुणे, मुंबईसारखी चांगली बाजारपेठ मिळणार असून तालुक्यातील अर्थव्यवस्था सक्षम होऊन शेतकरी वर्गाला याचा चांगला फायदा होणार आहे. प्रवाशांना एका तासात पुण्यामध्ये पोहचता येईल रेल्वे वाहतुकीचा फायदा शेतकरी यांच्या बरोबरच व्यापारी वर्गलाही याचा मोठा फायदा होणार असून फलटण एस टी स्टँड ते फलटण रेल्वे स्टेशन पर्यंत जाण्या साठी एस टी बस सुरू करणार असल्याचेही खासदार निंबाळकर यांनी स्पष्ट केले  

फलटणकरांचे स्वप्न सत्यात उतरले

अखेर फलटणकरांचे रेल्वेचे स्वप्न माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर व विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अथक प्रयत्नांना यश आल्याने फलटण शहर व तालुक्यातील लोकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

Related posts: