|Saturday, September 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » एल्गारप्रकरणी पुणे पोलिसांची दिल्लीत छापेमारी

एल्गारप्रकरणी पुणे पोलिसांची दिल्लीत छापेमारी 

पुणे / प्रतिनिधी : 

एल्गारप्रकरणी पुणे पोलिसांनी दिल्ली विद्यापीठाचे प्रा. हनीबाबू (वय 45) यांच्या दिल्लीतील निवासस्थानी मंगळवारी छापेमारी करत त्यांच्या घराची झडती घेतली. पोलिसांनी प्रा. हनीबाबू यांना अटक केली नसल्याचे गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त बच्चन सिंग यांनी स्पष्ट केले. मात्र, त्यांच्या घरातून पोलिसांनी हार्डडिस्क, पेनड्राईव्ह, लॅपटॉप असे इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त केले आहे. छापेमारी करताना पोलिसांनी संपूर्ण घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डेंग केलेले असून पंचनामा हनीबाबू यांना देण्यात आलेला आहे.

पुणे शहरात 31 डिसेंबर 2017 रोजी एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते व त्यानंतर दुसऱया दिवशी कोरेगाव भीमा याठिकाणी दोन गटात हिंसाचार उफाळून सार्वजनिक मालमत्तेचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. याप्रकरणात नक्षलवादी संघटनाचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपींचे अटकसत्र सुरू केल्याने देशभरात खळबळ उडाली होती. हनीबाबू हे दिल्ली विद्यापीठात अनेक वर्षापासून प्राध्यपकपदावर काम करत असून त्यांचे नाव संशयित अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतून समोर आले आहे.

दिल्ली येथून अटक करण्यात आलेल्या रोना विल्सन याच्या संपर्कात हनीबाबू असल्याची माहिती तपास पथकास मिळाली आहे. तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या पथकाने उत्तर प्रदेशातील गौतम बुद्धनगर येथे पोलिसांच्या मदतीने हनीबाबू यांच्या घरावर छापा टाकून महत्त्वपूर्ण कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त केले आहे.