|Monday, September 23, 2019
You are here: Home » leadingnews » माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांचा राजीनामा

माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांचा राजीनामा 

ऑनलाइन टीम / मुंबई : 

काँग्रेसला आज दिवसभरात तिसरा धक्का बसला आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्यापाठोपाठ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांनीही काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. कृपाशंकर हे उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं वृत्त आहे. ऐन विधनसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये पडझड सुरू झाल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे.

कृपाशंकर सिंह यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कृपाशंकर सिंह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. कृपाशंकर सिंह दोन दिवसांपूर्वीच भाजप नेते प्रसाद लाड यांच्या कार्यालयात गणेश दर्शनासाठी गेले होते. त्यावेळीच कृपाशंकर सिंह हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. आज त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने त्यावर शिक्कामोर्तबही झालं आहे.

कृपाशंकर सिंह यांना मुंबईतील काँग्रेसचा उत्तर भारतीय चेहरा म्हणून ओळखलं जात होतं. ते हे 2004 च्या आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात गृहराज्यमंत्री होते. कृपाशंकरसिंह यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी आरोप आहेत. तसंच कोकणातल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणीसुद्धा त्यांची चौकशी सुरू आहे.