|Saturday, February 22, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » विनोबांची-विचार पोथी

विनोबांची-विचार पोथी 

आचार्य विनोबा भावे यांचे 11 सप्टेंबर रोजी शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्ताने…

विनोबांचे जीवन म्हणजे अखंड चिंतन आणि चिंतनातून प्रयोग. आध्यात्मिक तसेच अनेकविध क्षेत्रातील विचारांची शेती विनोबा जीवनभर करत आले. त्यांचा हा विचार यज्ञ त्यांनी प्रेमभराने मृत्यूला आलिंगन देईपर्यंत चालूच होता. तीच शेती जणू शेकडो समृद्ध, सकस विचारांनी विचार पोथीच्या रूपाने फुलून आली.

‘महाराष्ट्र धर्म’ या मासिकाच्या रुपाने 1923 साली वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षापासून विनोबा लिहिते झाले. ‘उपनिषदांचा अभ्यास,’ ‘संतांचा प्रसाद’ इ. दीर्घ लेखनाबरोबरच विनोबांनी प्रचलित समाज व्यवस्था, राजकीय परिस्थिती इ. चा परामर्श घेणारे, हृदयाला जाऊन भिडणारे असे स्फूट स्वरूपातील पुष्कळ लेखनही केले. हे लेखन विचार कुंठित करणारे नसून विचार प्रवृत्त करणारे होते. लोकांना कार्यप्रवण करणारे होते. अर्थहीन रूढी आणि अंधश्रद्धा यावर प्रहार करणारे होते.

भक्ताचे काम आतल्या देवाला जागवण्याचे आणि पत्रकाराचे काम बाहेरच्या देवाला जागविण्याचे असते. ‘महाराष्ट्र धर्म’ नियतकालिकाच्या माध्यमातून हे दुहेरी काम विनोबांनी समर्थपणे केले. ‘महाराष्ट्र धर्म’ मासिक काही काळ विनोबांच्या तुरुंगवासामुळे बंद पडले. नंतर ते साप्ताहिक स्वरूपात सुमारे 3 वर्ष चालले. या कालावधीत विनोबांनी त्यात 222 लेख लिहिले. हे लेख म्हणजे गद्य अभंगच आहेत असे वि. स. खांडेकरांनी म्हटले आहे. त्यातील निवडक लेखांचा ‘मधुकर’ नावाचा संग्रह त्यातील पुष्ट विचारांनी आणि मोहक शैलीने लोकप्रिय झाला आहे.

1936 साली पहिली आवृत्ती निघाल्यापासून त्याच्या 18  च्या वर आवृत्त्या होऊन गेल्या. खप 45 लाखांवर गेला तरी त्यांचा टवटवीतपणा कायम आहे. सामाजिक आणि राजकीय संदर्भ बदलले असले तरी कालौचित्य यत्किंचतही कमी झालेले नाही.

विनोबांच्या ‘विचार पोथी’ च्या निर्मितीला अशी पोषक पार्श्वभूमी आहे. ‘मधुकर’ या पुस्तकातील काही लेखातील सार रूप विचार जसेच्या तसे विचार पोथीत आले आहेत. उदाहरणच द्यायचे झाले तर ‘रोजची प्रार्थना’ या लेखातील वाक्मयाचे देता येईल ते वाक्मय असे- दोन बिंदू निश्चित झाले की सुरेखा निश्चित होते. जीव आणि शिव हे दोन बिंदू कायम केले की परमार्थ मार्ग तयार झाला.

विनोबांनी 7 डिसेंबर 1928 पासून लेखनास प्रारंभ केला. पुढे हे विचारलेखन साधारण 3 वर्षे चालले. विचार पोथीच्या छापील आवृत्तीत 100 विचारांचा संग्रह आहे. विचारपोथीच्या विनोबांच्या हस्ताक्षरातील लेखनानंतर पहिली छापील आवृत्ती 1942 साली निघाली. आपलं लेखन त्वरेने छापावे, त्यातून आर्थिक लाभ मिळावा आणि अफाट लोकप्रियता मिळवावी अशी विनोबांची मनीषा नव्हती. विनोबांची विचार पोथी अनेकजण स्वहस्ते लिहून काढू लागले. तेव्हा आपोआपच त्यात नकळत चुकांचा समावेश झाला. छापील आवृत्तीची गरज का भासू लागली ते विनोबांच्या शब्दात वाचा- सांप्रतकाळी अशुद्ध लेखनाचा आणि गचाळ अक्षराचा प्रचार झाल्यामुळे आणि मूळ प्रतीचा आधार सर्व प्रतींना न मिळाल्यामुळे, एकेका प्रतीत अपपाठ शिरत गेले परिणामी काही वचने अर्थहीन झाली म्हणून शेवटी छापील आवृत्ती काढावी लागली आहे.

पूर्व श्रुतींचा आधार

विचार पोथी सर्वस्वी अपूर्व, नावीन्यपूर्ण असली तरी नवीन विचारांना, नवीन
प्रयोगांना पूर्व विचारांचा आधार विनोबांनी घेतला आहे. जुन्या झाडावर नव्या झाडाचे कलम करून त्याची मधुर फळे विनोबांसारखे आचार्य समाजाला अर्पण करीत असतात. यामुळे नव्याला जुन्याचा जोर मिळतो आणि जुन्याला नव्याचा तजेला प्राप्त होतो अशा पूर्वविचारांचे आलंबन स्वीकारून विचार पोथीला विनोबांनी पुष्ट केले आहे. उदाहरण म्हणून पुढील विचार पहा.

वेद प्रामाण्य म्हणजे पूर्वपरंपरेविषयी कृतज्ञताबुद्धी आणि नवीन पराक्रमाला स्फूर्तियुक्त मोकळीक (विचार क्र. 640)

आणखी एक उदाहरण पाहू-

‘वेद एकं सत’ म्हणतो पण त्याबरोबरच ‘विप्रा बहुधा वदन्ति’ असेही म्हणतो. ख‘मूढा बहुधा वदन्ति’ म्हणण्याची त्याची तयारी नाही. यात वेदाची अविरोधी वृत्ती दिसून येते. (विचार क्र. 389) अस्तेय म्हणजे चोरी न करणे, अन्याय मार्गाने धन न मिळविणे तर अपरिग्रह म्हणजे धनाचा, किंवा अन्य कोणत्याही गोष्टीचा संग्रह न करणे. विचार पोथीतील विचार क्र. 125 काय सांगतो पहा- अस्तेयाने मी जग जिंकतो अपरिग्रहाने ते सोडतो. अस्तेय पद्धतीचे नियमन करतो आणि अपरिग्रह प्रमाणाचे नियमन करतो. फलस्वरूप दोन्ही एकच आहेच. या विचाराचा परिपोष रामदासस्वामींच्या अखंड ब्रह्मचर्यात दिसून येतो. स्वामींच्या झोळीत शिवाजी महाराजांनी संपूर्ण राज्याची सनद टाकली आणि समर्थांनी ती सदन तशीच परत केली. अस्तेयाने जग जिंकण्याचे आणि अपरिग्रहाने ते सोडण्याचे असामान्य धैर्य समर्थासारखे विरागी पुरुषच दाखवू शकतात.

गणिती विनोबा

ईश्वराच्या खालोखाल विनोबा गणिताला मानतात. ‘मी संन्यास घेतला असता तर माझे नाव मी गणितानंद ठेवले असते.’ असे ते म्हणत. विनोबांच्या आयुष्यात हिशोबाला आणि गणिताला किती वरचे स्थान आहे. त्याचबरोबर विनोबा असेही म्हणतात की माणसाला गणित आले नाही तरी चालेल पण गणिताची दृष्टी असली पाहिजे.

हाच गणिती दृष्टिकोन विचार पोथीतल्या विचारातही दिसतो. विचार क्र. 32 गणिती सूत्ररूपात पुढीलप्रमाणे मानला आहे.

सेवा  DenbkeÀej बरोबर चिन्ह करणे   भक्ती

 भक्तीच्या या परिणामात सेवा गृहितच आहे. पण ती सेवा महान केव्हा होईल? अहंकार कमी झाला तर या सूत्रात छेदस्थानी अहंकार आहे. छेद जितका लहान तितके भागाकाराचे मूल्य जास्त. आणि छेद शून्य झाला तर किंमत अनंत पटीने वाढते. म्हणजेच अहंकार पूर्ण नाहीसा केलात तर तुमची छोटीशी सेवाही अनंतपट फळ देईल.

तुकोबा म्हणतात त्याप्रमाणे विनोबांकडे शब्दधन अमाप आहे. आणि त्या शब्दांचा वापर ते चातुर्याने करतात. ‘अमूल्यता’ या शब्दाचा उपयोग करून विचार आशयधन करावा तो आचार्यानीच. विचार पोथीतील विचार क्र. 36 याचे उत्कृष्ट उदाहरण आहे.

‘तो विचार असा-

ज्यांनी रत्नांची लाखो रुपये किंमत ठरविली ते त्यांची ‘अमूल्यता’ गमावून बसले. संत खरे रत्नपारखी. कारण त्यांनी रत्नांची अमूल्यता ओळखली. अमूल्यतेचा दुहेरी अर्थ वापरून विनोबांनी संसारी माणसे आणि संत यांच्यातील फरक कसा सपष्ट केला आहे पहा.

अर्थशास्त्राच्या भाषेतील विचार असा-संन्यास ही नोट आहे. कर्मयोग नाणे. दोघांची किंमत एकच.

या विचारांचा मागोवा घेतला तर काय दिसते यातील वाक्मयरचना सिद्धांतावर आधारलेली आहे. प्रसंग विशेष सर्व शास्त्रातल्या भाषेचा सहज उपयोग करण्यात आला आहे. या विचारात ज्ञानलब्धी आहे पण रसातली आसक्ती नाही. या विचारांमुळे चित्त क्षुब्ध होत नाही. चित्तात खळबळ माजत नाही उलट हे विचार आध्यात्मिक पुष्टी देतात.

हेमंत मोने

Related posts: