|Saturday, February 22, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » ऐश्वर्य रूपाला आले

ऐश्वर्य रूपाला आले 

कवी नरेंद्र पुढे वर्णन करतात-श्रीकृष्णाची शंखाकृती मान म्हणजे लावण्याचा करंडा होता व त्यावर त्याच्या मुखाचा कळस झळकत होता. श्रीकृष्णाच्या मुखाचे वर्णन काय करावे? त्यापुढे चंद्रकिरणांची प्रभा लोपत होती. जणू आकर्षणशक्तीचा तो वर्तुळाकार गाभाच होता. लावण्य सरोवरातील कैवल्यफळ होते. ब्रह्मसुखाचे नीलकमल होते. सौंदर्यच गोठून आकारले होते. कृपेच्या मुशीत जणू कैवल्य ओतले होते. श्रीमुखाच्या रूपाने ऐश्वर्य रूपाला आले होते. त्यास चराचरात उपमा नव्हती. चंद्राला प्रभा शोभावी तशी कृष्णाची मुखश्री शोभत होती. त्याखालची हनुवटी म्हणजे जणू अमृतच गोठून हनुवटीच्या आकाराला आले होते. त्यावर सुप्रसन्न, स्मितवदन मिरवत होते. कृष्णमुख म्हणजे ब्रह्मविद्येचे अधि÷ान होते. आकर्षकतेला दीक्षा देणारे गुरु होते. पद्मराग मण्याच्या गाभ्याचे तेज फाकावे त्याच्या सहस्त्रपट तेज त्या मुखावर होते. बिंबफळ घन व्हावेत, रातकमळे रममाण व्हावीत तसे ओठ शोभत होते. जेथे ब्रह्मविद्येची खाण आहे, अमृताला संजीवनी देणारी वाणी जेथून प्रकटते व लक्ष्मी जिथे रममाण होते, ते हे स्थान आहे. रत्नाची खाण उघडावी तसे दात शोभत आहेत. कठीणपणात त्यांनी वज्राला मागे सारले. पक्व डाळींबाचे दाणे दिसावेत त्याहीपेक्षा हे दात शोभत होते, कारण डाळींबाच्या दाण्यात आर्दता होती, दातात ती नव्हती.

भगवान श्रीकृष्ण मेघगंभीर वाणीने जर बोलले तर अमृताचा वर्षाव होत होता. ती ऐकून श्रमलेल्या लोकांचा ताप शांत होत होता. श्रीकृष्णाचे मुखलावण्य पाहिल्यावर असुरांच्या मनातसुद्धा आदर निर्माण होत होता व त्यांची वृत्ती सात्विक होत होती. शुक्राचार्य आणि बृहस्पती एकमेकांचे कौतुक पहात नाहीत तशी कृष्णाची दोन्ही नेत्रकमळे होती. ती एकमेकाकडे पहात नव्हती. ते सुनील विशाल डोळे उघडझाप करीत होते व त्यातून प्रेम पाझरत होते. भुवया इंद्रधनुष्यासारख्या होत्या. असे हे सौंदर्य वेड लावीत होते. साक्षात कैवल्य बाळ होऊन झोके खेळावे तसे कर्ण होते. कान जणू मुक्तिमंदिराची विवरे होती किंवा सौंदर्यरूपी गुहेत जाणारी द्वारे होती. कानातली कुंडले सूर्य, चंद्राप्रमाणे झळकत होती. त्यांच्या तेजाची प्रभा दोन्ही गालांवर शोभत होती. भालप्रदेशावर अर्धचंद्राकार टिळा रेखला होता. त्यावर कस्तुरीचा तिलक होता. तो टिळा नव्हता तर सतरावी कला ललाटाला शरण आली होती. ती नेत्ररूपी चकोरांना अमृताचा चारा देण्यासाठी आली होती. त्यावर हरिचंदनाचा तिलक होता. मस्तकावर मुकुट शोभत होता. जणू सौंदर्याने चैतन्याचा माचा रचावा व वर वर्तुळाकार कळस असावा तसा मुकुट दिसत होता. त्यावर जी रत्ने होती ती कोटय़वधी सूर्य उगवावेत तशी चमकत होती. आकाशात वीज चमकावी तसा अंगावर शेला चमकत होता. कळीवरून परिमळाचे रजःकण उडावेत तसा शेला वाऱयाने उडत होता. मुखावर चंदनाची पातळ उटी होती. त्यातून सुगंध वाहत होता. दोन्ही बाजूला चंवऱया धरून सेवक उभे होते. त्या चवऱयांचे दंड सोन्याचे होते. मध्ये श्रीकृष्णाचे सुवर्णाचे राजसिंहासन होते.

Ad. देवदत्त परुळेकर

Related posts: