|Saturday, February 22, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » ‘क्लास’ कोर्ट

‘क्लास’ कोर्ट 

अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुषांच्या एकेरीत स्पेनच्या राफेल नदालने, तर महिला एकेरीत कॅनडाच्या बियांका आंद्रेस्क्यू हिने बाजी मारत आपला ‘क्लास’ दाखवून दिला आहे. यातील बियांकाचे विजेतेपद हे अनेकार्थांनी महत्त्वपूर्ण मानावे लागेल. मागील साधारपणे दोन दशके टेनिस विश्वावर प्रामुख्याने अमेरिकेच्या विल्यम्स भगिनींचे वर्चस्व होते. त्यातील सेरेना विल्यम्स नावाच्या झंझावाताने स्वत:चे असे एक युगच टेनिसमध्ये निर्माण केले होते. सुपरमॉम सेरेनाला मागच्या काही काही दिवसांपासून मार्गारेट कोर्टचा 24 ग्रँड स्लॅम विजेतेपदाचा विक्रम खुणावत आहे. मात्र, 23 पदकांपर्यंत मजल मारलेल्या या महान खेळाडूला तब्बल चौथ्यांदा विजेतेपदाने हुलकावणी दिली आहे. मातृत्वाची जबाबदारी, वय आणि क्षमता हा कोणत्याही महिला क्रीडापटूसाठी कसोटीचा काळ असतो. आज सेरेना याच टप्प्यातून जाते आहे. स्वाभाविकच अशा स्थितीतही तिने मारलेली मजल तिच्या जिद्दीवर व झुंजारपणाची साक्ष देणारीच आहे. तिची चिकाटी व वीजिगीषू वृत्ती पाहता आगामी काळातही तिची रॅकेट घुमत राहील व नवा विक्रम ती प्रस्थापित करू शकेल, यात शंकाच नाही. मार्गारेट कोर्ट, विल्यम्स भगिनींबरोबरच जर्मनीची स्टेफी ग्राफ, हेलन विल्स, ख्रिस एव्हर्ट, मार्टिना नवरातिलावो अशा अनेक दिग्गज खेळाडूंनी टेनिसच्या इतिहासात सुवर्ण अध्याय लिहिला. मोनिका सेलेस, मार्टिना हिंगीस यांच्यापासून ते मारिया शारापोवापर्यंत कितीतरी टेनिसपटूंनी मैदान गाजवले. यशाच्या अत्युच्च शिखरावर असलेल्या मोनिका सेलेसवर स्टेफीच्या चाहत्याने केलेला चाकूहल्ला, त्यातून तिचे कोसळलले करिअर अशा काही कटू आठवणी सोडल्या, तर महिला टेनिसचा ग्राफ हा कायम चढता राहिलेला दिसेल. काही वर्षांनंतर का होईना टेनिसला एक नवी सम्राज्ञी मिळाली आहे. आज सेरेना युग सरत असताना नवी टेनिसक्वीन कोण असेल, हा प्रश्न मनात येतोच. बियांका, नाओमी ओसाका, सिमोना हेलेप का ऑस्ट्रेलियाची ऍश्ले बार्टी यापैकी कोण आता कोर्टवर आपला करिष्मा दाखविणार, याचे उत्तर अर्थात काळच देईल. किंबहुना, बियांकाकडूनही निश्चितपणे अपेक्षा असतील. वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी तिने पहिल्यावहिल्या विजेतेपदावर मोहोर उमटविली आहे. सेरेनासारख्या कसलेल्या व अनुभवी टेनिसपटूविरोधात कोणताही दबाव न घेता अत्यंत नैसर्गिक खेळ तिने केला. मोक्याची क्षणी खेळ उंचावणे, सातत्य, तंदुरुस्ती या गोष्टी साध्य झाल्या, तर कॅनडाच्या या कन्येला नक्कीच नवा इतिहास घडविता येईल. पुरुष टेनिसमधला अभंग ‘नाद’ म्हणजे नदाल. अमेरिकन ओपनवर पुन्हा एकदा नाव कोरत त्याने जणू हेच सिद्ध केले आहे. बियॉन बोर्ग, जॉन मेकेन्रो, बोरिस बेकर, जिमी कॉनर्स, इव्हान लेंडल, स्टीफन एडबर्ग, जीम कुरिअर, पीट सॅम्प्रस, आंद्रे आगासी अशा एकापेक्षा एक खेळाडूंनी टेनिस जगतात वेगळे स्थान निर्माण केले. कोर्ट जागवत ठेवणाऱया टेनिसच्या या शिलेदारांची परंपरा अधिक जोरकस पुढे नेली असेल, तर ती बिग थ्रीने. म्हणूनच पुरुष एकेरी म्हणजे बिग थ्री, असे समीकरणच सध्या तयार झाले आहे. खरे तर रॉजर फेडरर, राफेल नदाल व नोवाक जोकोविच हे त्रिदेव समकालीन असणे, हे टेनिसचे अन् चाहत्यांचे दोघांचे भाग्य म्हणावे लागेल. तिघांचेही तंत्र वेगळे असले, तरी आपल्या दर्जेदार खेळातून त्यांना टेनिसला वेगळय़ा उंचीवर नेले आहे. या दशकातील 40 ग्रँडस्लॅमपैकी 33 अंतिम सामने या त्रयीने जिंकले आहेत, यावरून त्यांचा प्रभाव लक्षात येतो. वय, तंदुरुस्ती अशा दोन्ही पातळय़ांवर तरुण खेळाडूंना पुरून उरत या त्रिकुटाने आपला दबदबा टेनिसविश्वात कायम ठेवला आहे. तो केवळ आणि केवळ ‘क्लास’च्या बळावर हे विसरता येत नाही. यातील नदालचे यश हे सवार्थाने उठून दिसणारे म्हणता येईल. लाल मातीचा बादशहा ही नदालची मुख्य ओळख. पेंच ओपनमध्ये मिळविलेली तब्बल 12 विजेतेपदे त्याची ही ओळख ठळक बनवितात. मात्र, ऑस्ट्रेलियन, विंबल्डन व अमेरिकन ओपनमध्येही जेतेपदाचा मुकुट उंचावत चौफेर यश मिळविण्याची कामगिरी या अफलातून टेनिसपटूने प्राप्त केली आहे. मधल्या काळात नदालला सातत्याने दुखापतींना सामोरे जावे लागले. त्याचे करिअर संपणार की काय, अशा वळणावर असतानाही त्यातून भरारी घेत त्याने येथवर मजल मारली आहे, हे लक्षात घ्यायला हवे. वयाची तिशी पार केल्यानंतर पाच ग्रँडस्लॅम विजेतेपदे पटकावणारा नदाल हा पहिला खेळाडू ठरत असेल, तर त्यातून त्याची जिद्द किती पराकोटीची आहे, हे दिसून येईल. टेनिसमध्ये सर्वाधिक म्हणजेच 20 ग्रँडस्लॅम पदके फेडररच्या नावावर आहेत. फेडररची बरोबरी करण्यासाठी नदालला केवळ एका पदकाची गरज आहे. तर जोकोविच 16 पदकांसह तिसऱया स्थानावर आहे. मागच्या दोन वर्षांत जोकोविच, नदालने प्रत्येकी 3, तर फेडररने एक जेतेपद प्राप्त केले आहे. त्यांच्यातील लढती किती अटीतटीच्या सुरू आहेत, हे समजून घेण्यासाठी ही आकडेवारी पुरेशी ठरावी. मला इथवर पोहोचण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. वैयक्तिक समाधान मिळविण्यावर माझा भर असतो, असे नदाल म्हणतो. त्यावरून खेळातून आनंद मिळविण्याची त्याची खिलाडूवृत्तीच अधोरेखित होते. आज फेडरर 38 वर्षांचा, नदाल 33 वर्षांचा, तर जोकोविच 32 वर्षांचा आहे. तथापि, यापुढेही खेळाचा मनमुराद आनंद लुटण्याची इर्ष्या त्यांच्यात जाणवते. मुळात या तिघांच्या जवळपासही कुणी खेळाडू नसल्याने स्वाभाविकच पुढच्या काळात आणखी काही पदके त्यांच्या नावावर असू शकतील. वास्तविक, टेनिस हा अत्यंत सुंदर क्रीडाप्रकार आहे. त्यातील चापल्य, शैलीदार फटके पाहण्याचा आनंद काहीच औरच. भारतासारख्या मोठय़ा देशाची या खेळातील मजल मात्र दुहेरीपर्यंत सीमित राहिली आहे. या खेळातील नजाकत नि झंझावात पाहून आपल्याकडेही एखादा नदाल, फेडरर, सेरेना, बियांका असावी, असे कुणाला नाही वाटणार? पायाभूत सुविधा व क्लासकडे लक्ष केंद्रित केले, तर आगामी काळात आपले टेनिसपटूही कोर्ट गाजवू शकतात. हे निश्चित.

Related posts: